मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर आज सडकून टीका केलीय. विशेष म्हणजे त्यांनी कंत्राट वाटपावरुन भाजवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपासून अनेक मुद्द्यांवर भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजप हिंदुत्वाचं कंत्राट घेतल्यासारखे काम करत आहे. भाजप श्रीरामांच्या नावावर पैसे गोळा करत आहे. ते स्वतःच्या मौजेसाठी पैसे वापरत आहेत. निर्यात शुल्क 40 टक्के लावल्याने कांदा विकता येत नाही. टोमॉटोला जास्त भाव आला हे ह्यांना पचले नाही, म्हणून नेपाळवरून त्यांनी टोमॅटो मागवले. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले तर हे भाजपवाल्यांना पचत नाही”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
“हे सरकार फक्त दलाल चालवत आहे. निर्मल बिल्डिंग आहे. तिथून सगळे कंत्राट वाटप केले जात आहेत. सरकारचा एक दलाल तिथे बसला आहे. राज्यातील जनतेचा पैसा तिथून लुटला जातोय. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. येत्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. सरकारला आम्ही प्रश्न विचारणार आहोत. ‘शासन आपल्या दारी’ हा सरकारचा पैसे उधळण्याचा कार्यक्रम आहे. राज्यातील जी काही कंत्राट वाटले जातात त्या व्यक्तीकडून कसे वाटले जातात? याचे पुरावे आहेत. याचा आम्ही बुरखा लवकरच फाडणार”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
भाजपकडून सुमार कामगिरी असणाऱ्या खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या या रणनीतीवरही नाना पटोले यांनी टीका केलीय. “भाजप हा जनमत संपलेला पक्ष आहे. पराभवाच्या भीतीने भाजप असे करत आहे. हा जुमला देणारा पक्ष आहे, जिकंण्यासाठी असा असफल प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
“या सरकारमध्ये मंत्री संजय राठोड, मंत्री अब्दुल सत्तार, उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, त्यांच्यावर आरोप आहेत. ते सरकारमध्ये बसले आहेत. या सरकारवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. सत्तार हे तर छोटे प्यादे आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली. “हिंदुत्वाचे आम्हीच ठेकेदार असा दावा करणाऱ्या भाजपवाल्यांना भारत माता की जय म्हणायची लाज वाटत आहे. त्यांना फक्त मोदी की जय म्हणायचं आहे. ते त्यांच्या पोटातून आले आहेत”, अशी देखील टीका नाना पटोले यांनी केलीय.