पक्षफुटीचं संभाव्य भलंमोठं संकट, काँग्रेसची पुढची रणनीती काय? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
काँग्रेस पक्षाला भलंमोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्र काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचा 10 ते 15 आमदारांचा गट फुटून भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. “अशोक चव्हाण यांनी अजून तरी पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मी स्वत: त्यांची बाईट ऐकली. ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकरता भरपूर काही केल्याचं ते म्हणत होते. काँग्रेस पक्षाने त्यांना खूप मोठी संधी दिली. आताही देत होते. कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला आले होते. त्यांच्या समावेत सर्व ज्येष्ठ नेत्यांची रणनीतीची बैठक टिळक भवनला झाली होती. या बैठकीला आम्ही सर्व उपस्थित होतो. तेव्हा अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
“या बैठकीत आम्ही येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा केली. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. जवळपास संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्या डोक्यात असं काही सुरु आहे ते आम्हाला वाटलं नाही. ते जाताना बाळासाहेब थोरात यांना सांगून गेले की, आपण उद्या सकाळी अकरा वाजता पुन्हा बसू आणि चर्चा ठेवू”, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
‘भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?’
“काँग्रेस पक्षाच्यावतीने जागावाटपाच्या कार्यक्रमात त्यांची प्रमुख भूमिका होती. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता. त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती. मानाचं स्थान दिलं होतं. सत्तेची स्थानं दिली होती. आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून काम करत होते. पण त्यांनी असा निर्णय का घेतला, इतर बऱ्याच जणांनी कशाकरता निर्णय घेतला हे आपल्याला माहिती आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?”, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
काँग्रेसची आता पुढची रणनीती काय?
“अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसांपासून सुतोवाच होत होतं. आज आम्ही बाळासाहेब थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांशी संपर्क केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेची उमेदवारी भरण्याच्या वेळेला विधीमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल. या सर्व परिस्थितीत आम्ही ज्या-ज्या विधीमंडळ सदस्य आणि नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, कुणीही जाणार नाही. भाजपकडून मुद्दाम वावड्या उठवल्या जात आहेत. नावं घेतली जात आहेत. पण त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आवाहन केलं.
“काँग्रेस पक्ष हा जनतेमध्ये न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळे घडतंय ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. भाजपला आज निवडणुकीला सामोर जायचं धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करुन आपल्याला काही संधी मिळते का? त्याचा प्रयत्न चाललेला आहे. नेतेमंडळी जरी गेले तरी त्यांना मते देणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वासामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकीला ते जेव्हा सामोरे जातील तेव्हा त्यांचं खरं चित्र दिसेल. आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत. अशोक चव्हाण यांनी जो दुर्देवी निर्णय घेतला आहे त्याबद्दल खंत व्यक्त करतो. ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा करतो. त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना कशाची भीती होती ते येत्या दोन दिवसांत सांगतील. पण काँग्रेस पक्ष मजबुतीने राजकीय आव्हानाला सामोरे जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.