‘वाघ इतक्या लवकर गवत खाईल वाटलं नव्हतं’, काँग्रेसच्या बड्या नेत्याची खरमरीत टीका
"त्यांनी २०१९ ला मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली. आता त्यांना पाठिंबा दिला. कदाचित एखादी नस दाबली असेल. कूच तो दाल मैं काला हैं. आधी थोडेसे झुकले होते. आता कमरेतून झुकले. हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही", अशा तिखट शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेचं आता महायुतीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली. शेळी गवत खाईल असे राज ठाकरे यांचे भाजपमध्ये जाऊन होऊ नये. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
“त्यांनी २०१९ ला मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली. आता त्यांना पाठिंबा दिला. कदाचित एखादी नस दाबली असेल. कूच तो दाल मैं काला हैं. आधी थोडेसे झुकले होते. आता कमरेतून झुकले. हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही”, अशा तिखट शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
प्रकाश आबेडकर यांचा टोला
“बीजेपी ही पार्टी संपली. आता मोदी पार्टी आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बीजेपीला नाही तर मोदी पार्टीला पाठिंबा दिलेला आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. “मी उमेदवार म्हणून इथली परिस्थिती लोकांसमोर मांडली, आता मतदारांनी ठरवायचं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची निवडणूक लढवावी, आम्ही आमची निवडणूक लढवत आहोत. एकदोन दिवसांमध्ये यवतमाळ वाशिम संदर्भातील निर्णय घेऊ. निवडणूक आयोगाने चिन्ह संदर्भातील आमचा अर्ज निकाली काढला नाही. आधी सिलेंडर देतो म्हणाले पण दिलं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह मिळाले. अकोल्यात कुकर चिन्ह मिळाले ते लोकांपर्यंत पोहोचले आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे जाहीर करतो”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मांडली.