राजीव तू हे काय केलेस? तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक
काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. (Congress MP Rajeev Satav dies of COVID-19 complications)
मुंबई: काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. (Congress MP Rajeev Satav dies of COVID-19 complications )
उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त: पवार
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
जगन्मित्र हरपला: अजित पवार
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता
कॉंग्रेस पक्षाचे नेते, गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. लोकांच्या प्रती प्रचंड आस्था असणारा, प्रत्येत कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा एक उमदा नेता आज कॉंग्रेस पक्षाने गमावला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.
उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाला मुकलो: राऊत
काँग्रेस पक्षातील माझे सहकारी व खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सातव कुटुंबासह काँग्रेस परिवारातील आम्हा सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काँग्रेस प्रति एकनिष्ठता, उत्साही, प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, अशी भावना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
नि: शब्द: मिटकरी
काँग्रेसचे गुजरात चे प्रभारी व नेते तसेच लोकसभेचे खासदार राजीवजी सातव यांचे दुःखद निधन झाले. काळाने एकमागून एक चांगली माणसे हिरावून न्यायला सुरुवात केली आहे. एक मोठं राजकीय नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. निःशब्द, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.
भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावले: पाटील
सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
माणुसकी जपणारे नेते: सुळे
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीव सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिक नेतृत्व गमावले: चंद्रकांतदादा
महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Congress MP Rajeev Satav dies of COVID-19 complications)
राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? pic.twitter.com/dR0txA7JkS
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2021
संबंधित बातम्या:
MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी
MP Rajeev Satav Death | मी माझ्या मित्राला गमावले, राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावूक
(Congress MP Rajeev Satav dies of COVID-19 complications)