Lata Mangeshkar: लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण नको, स्मारकाचा विचार देशानं करावा, राऊतांचा भाजपवर पलटवार; स्मारकाचा वाद तापणार?

| Updated on: Feb 07, 2022 | 1:00 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कातच लता मंगेशकर यांचं स्मृती स्थळ उभारण्याची मागणी केली आहे.

Lata Mangeshkar: लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण नको, स्मारकाचा विचार देशानं करावा, राऊतांचा भाजपवर पलटवार; स्मारकाचा वाद तापणार?
लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण नको, स्मारकाचा विचार देशानं करावं, राऊतांचा भाजपवर पलटवार; स्मारकाचा वाद तापणार?
Follow us on

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी शिवाजी पार्कातच लता मंगेशकर यांचं स्मृती स्थळ उभारण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी त्याबाबतचं पत्रंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांना लिहिलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींच्या स्मारकाबाबत राजकारण करू नये. लतादीदी या महान व्यक्तिमत्व होत्या. त्यांचं स्मारक उभारणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. शिवाजी पार्कात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती चौथरा आहे. त्यातच आता भाजपने शिवाजी पार्कातच लतादीदींचं स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

राम कदम यांची मागणी काय?

राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचं स्मृती स्थळ शिवाजी पार्कात उभारण्याची मागणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शिवाजी पार्कात लतादीदी पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मृती स्थळ उभारण्यात यावं. जनतेच्या मागणीचा सन्मान करून तात्काळ हे स्मृती स्थळ निर्माण केलं पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

स्मारकाचा विचार देशाने करावा

लता दिदी या महान आत्मा होत्या. आपल्या धरतीवर त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचं नातं होतं. या देशात त्यांनी जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर आहेत, अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्यांचं स्मारक बनवणं इतकं सोपं नाही. त्या काही राजकीय नेत्या नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. महान होत्या. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असं राऊत म्हणाले.

तुम्ही देशाची वाट लावली

यावेळी राऊत यांनी अभिनेता शाहरुख खानला ट्रोल केलं जात असल्याबद्दलही ट्रोलर्संना झापले. हे कोण लोक आहेत. त्यांना थोडीही लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे. ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

अमेरिकेला जाण्याआधी मोदी फोन करतात आणि लतादीदींना म्हणतात, ‘हॅलो, मैने फोन किया क्यूंकी…’

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Dilip Bade: मराठवाड्याचे पोर्ट्रेट मास्टर काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं हृदयविकाराने निधन!