Corona In Mumbai: धक्कादायक! मुंबईत एकाच दिवशी कोरोनाचे 840 रुग्ण, धोका वाढतोय!
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांमुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. मात्र एप्रिलमध्ये 30 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या मे महिन्यात थेट अडीच हजारांवर गेल्याने पालिकेची चिंता वाढली
मुंबई, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा (Corona In Mumbai) सैल झाला होता. सण उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्यात येत होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने मुंबईकरांच्या जीवाला घोर लागला आहे. गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 8512 चाचण्यांमध्ये तब्बल 840 कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील 51 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून 11 जणांना ऑक्सिजनची गरजही लागली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांमुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. मात्र एप्रिलमध्ये 30 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या मे महिन्यात थेट अडीच हजारांवर गेल्याने पालिकेची चिंता वाढली होती. ही रुग्णसंख्या पुन्हा 250 ते 300 पर्यंत खाली आली होती. मात्र ऑगस्टपासून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे दुसऱ्या लाटेत रुग्णांना स्वास घेण्यास त्रास होत होता, त्याच प्रमाणे आता दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळत आहे.
मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
- सध्याचे सक्रिय रुग्ण 5835
- रुग्ण दुपटीचा कालावधी 947 दिवस
- रुग्णवाढीचे प्रमाण 0.69 टक्के
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.8 टक्के
आठवडाभराची रुग्णसंख्या
- 14 ऑगस्ट- 882
- 15 ऑगस्ट- 584
- 16 ऑगस्ट- 332
- 17 ऑगस्ट- 975
- 18 ऑगस्ट- 1201
- 19 ऑगस्ट- 1011
- 20 ऑगस्ट- 840
ओमिक्रोनच्या रुग्णात वाढ
सध्या समोर येत असलेल्या केसेसमध्ये फुफ्फुसाच्या संबंधित तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा त्रास दिसून येत आहे. राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे 200 कोरोना रुग्णाच्या सरसरी विश्लेषणात डॉक्टरांनी ही समस्या अधोरेखित केली आहे.
ओमिक्रॉनमुळे घसा खवखवणे, वाहणारे नाक, चिडचिड आणि घशातील सूज यांसह अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्याचे निरक्षणात समोर आले आहे. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जरी जास्त नसली तरी ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे,
मुंबईत, कोविड -19 रुग्णालयांमध्ये सुमारे 20 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत आणि 17 व्हेंटिलेटरवर आहेत. कोविड-19 ची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात, परंतु काही टक्के रुग्णांमध्ये तो त्रासदायक खोकला, सतत ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो.