मुंबई : कोरोनाचं थैमान दिवसागणिक वाढत चाललं आहे (Corona report of 53 journalist positive). मुंबईतील एकूण 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये पत्रकार आणि फोटोग्राफर यांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागात वास्तव्यास आहेत (Corona report of 53 journalist positive).
दरम्यान, 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना सर्व पत्रकारांच्या तपासणीची विनंती केली. याशिवाय पॉझिटिव्ह पत्रकारांच्या क्वारंटाईनची चांगली व्यवस्था व्हावी, अशीदेखील विनंती जगदाळे यांनी महापौरांकडे केली. यावेळी महापौरांनीदेखील योग्य व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं.
महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
“या पत्रकारांची जेव्हा चाचणी झाली तेव्हा मीदेखील माझी तपासणी केली होती. 87 पेक्षा जास्त पत्रकारांची तपासणी केली गेली होती. पत्रकारांनी रस्त्यावर किंवा बाहेरुन न काम करता घरुन काम करा, अशा सूचना चॅनलच्या वरिष्ठांनी देणं जरुरीचं आहे. कोणाच्याही जीवाशी आपण खेळलो नाही पाहिजे. क्वारंटाईनसाठी आम्ही चांगल्या हॉटेलची व्यवस्था करत आहोत. तसेच काही रुग्णालयेदेखील आम्ही बघत आहोत.
मात्र, 3 मेपर्यंत संसर्ग होऊ नये यासाठी रस्त्यावर न काम करता घरुनच काम करावं, असं प्रत्येक वाहिन्यांच्या वरिष्ठांनी सांगावं. याशिवाय पत्रकार हे देशाचे चौथे स्तंभ आहेत. त्यामुळे हे स्तंभ चांगलेच राहिले पाहिजेत. ठाण्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या पत्रकारांची योग्य माहिती मिळाली तर ठाण्याच्या महापौरांशी बोलून त्यांची तिथे चांगली व्यवस्था करता येईल.
विनोद जगदाळे काय म्हणाले?
पत्रकारांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठाण्यामध्ये दोन पत्रकार जेव्हा कोरोना पॉझिटीव्ह सापडले तेव्हा टीव्ही पत्रकारांची आमची जी संघटना आहे या संघटनेच्या अध्यक्षच्या नात्याने मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यव्हार केला. पत्रकार रात्रं-दिवस आपला जीव धोक्यात घालून वृत्तांकन करत आहेत. त्यामुळे त्यांची चाचणी होणे जरुरीचं आहे, अशी विनंती मी पत्रामार्फत केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच मुंबई महापालिकेला याबाबत निर्देश दिले.
महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर अधिकाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं. मात्र, दोन दिवस हा कॅम्प चालला. यात 167 पत्रकारांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून माहिती मिळत आहे की, 167 पैकी 53 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामन आहेत. सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
जे पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांच्या क्वारंटाईनची व्यवस्था झालेली आहे. अजून काही पत्रकार, कॅमेरामन जे ठाणे, वसई, विरार किंवा मीरा रोडला राहतात त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र, ते शक्य नाही. कारण या पत्रकारांचे घरं लहान आहेत. त्यांच्या परिवारात चार ते पाच सदस्य आहेत. कुणाकडे लहान बाळही आहे. अशावेळी मुंबई महापालिकेनं योग्य पावलं उचलावेत. जे पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांची रवानगी योग्य ठिकाणी क्वारंटाईनसाठी ठेवण्यात यावी, अशी आमची विनंती आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील
गडचिंचले भाजपचा गड, 10 वर्षांपासून त्यांचा सरपंच, अटकेतील बहुसंख्य भाजपचेच : काँग्रेस