Delta Variant : कोकण, उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ डेल्टा प्लसच्या रुग्णांची नोंद, राज्याची संख्या 66 वर, 5 जणांच्या मृत्यूनं चिंता कायम
आतापर्यंत डेल्टा प्लस वेरिएंटच्या संसर्गामुळे रत्नागिरीमध्ये 2, मुंबई, रायगड आणि बीडमध्ये प्रत्येकी एक 1 दगावला आहे. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. डेल्टा वेरिएंटमउळे दगावलेल्या व्यक्तींचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होते आणि ते अनेक आजारांनी ग्रस्त होते, अशी माहिती आहे.
मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे.राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराने संक्रमित झालेले 66 रुग्ण सापडले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या 66 रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्याच्या विविध भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेंसिंग तपासात ही प्रकरणे आली आहेत. रत्नागिरी, रायगड आणि बीडमध्ये शुक्रवारी डेल्टा प्लस प्रकारातून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या लसीनंतरही मृत्यू
आतापर्यंत डेल्टा प्लस वेरिएंटच्या संसर्गामुळे रत्नागिरीमध्ये 2, मुंबई, रायगड आणि बीडमध्ये प्रत्येकी एक 1 दगावला आहे. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. डेल्टा वेरिएंटमउळे दगावलेल्या व्यक्तींचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होते आणि ते अनेक आजारांनी ग्रस्त होते, अशी माहिती आहे. मृतांपैकी दोघांना कोरोना विषाणूच्या लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, दोघांना एक डोस मिळाला होता. त्याचबरोबर पाचव्या व्यक्तीच्या लसीकरणाबाबत माहिती घेतली जात आहे.
काही प्रकरण जूनमधील
राज्यातील डेल्टा प्लस वेरिएंटच्या रुग्णांची संख्या 21 वरून 66 वर पोहोचली आहे. मात्र, यातील काही प्रकरणं जून महिन्यातील आहेत, ज्यांचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल नुकताच आला आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ.प्रदीप आवटे यांनी नागरिकांनी घाबरण्याची काहीच गरज नसल्याचं म्हटलंय. ज्या व्यक्तींना पहिल्यापासून अनेक आजार आहेत अशा व्यक्तींचा डेल्टा प्लस वेरिएंटमुळं मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. डेल्टा वेरिएंट हा सर्वात घातक प्रकार आहे, त्याचे 80 टक्के रुग्ण आढळल्याचं त्यांनी सांगतिलंय. मात्र, कोरोनाची लस त्यावर प्रभावी असल्याचंही सांगण्यात आलंय.
जळगावात नवे 6 रुग्ण, एकूण संख्या 13 वर
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटत असतानाच, जिल्ह्यात 3 ठिकाणी कोरोनाचा नवा आणि घातक व्हेरियंट मानला जाणाऱ्या डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी साधारण 2 महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एकाच गावात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळले होते.
जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये जळगाव जिल्ह्यात डेल्टा वेरिएंटचे पुन्हा 6 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे हे सर्व रुग्ण जळगाव, जामनेर आणि पारोळा या वेगवेगळ्या तालुक्यातून समोर आले आहेत. जळगावात 2, जामनेरात 3 तर 1 रुग्ण पारोळा तालुक्यातील आहे. नव्याने आढळलेल्या सहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते कोरोनातून बरे झालेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
मुंबईत एका महिलेचा मृत्यू
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस वेरिएंटमुळे झालेल्या संसर्गामुळे मुंबईत 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची पहिली घटना गुरुवारी समोर आली होती. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , कोरोना लसीचे दोन्ही डोस या वृद्ध महिलेनं घेतले होते. डेल्टा प्लसमुळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेच्या मृत्यूनंतर त्या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या आणखी दोन लोकांनाही डेल्टा प्लसच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस वेरिएंटची सर्वाधिक प्रकरणं उत्तर महाराष्ट्रातील जळगावातून आली आहेत. जळगावात डेल्टा प्लसचे 13 रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत 12 आणि मुंबईत 11 रुग्ण आढळले आहेत.
चंद्रपूर मध्ये डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच डेल्टा प्लस वेरिएंटचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला रुग्ण या विषाणूने बाधित असल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रँडम चाचणीत ही महिला बाधित आढळली होती. तिला विलगीकरणात पाठविण्यात आले होते. संशयानंतर नमुने दिल्लीला पाठविले होते. या चाचणीचा अहवाल आला असून त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट झाला असल्याचं स्पष्ट झालंय. प्रशासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
घाबरून न जाण्याचं आवाहन
राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे, मुंबई, बीड आणि औरंगाबाद, चंद्रपूरमध्ये डेल्टा प्लसचा वेरिएंटचे रुग्ण आढळलं आहेत. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
इतर बातम्या:
Mumbai Corona | मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी
Coronavirus Delta Plus variant cases are increasing rapidly in Maharashtra so far 66 cases have been reported, 5 deaths