ठाकरे गटाला धक्का देणारी मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत. कोर्टाच्या समन्सवर आता ठाकरे गटाकडून काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पावसाळ्यानंतर राज्यात मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई महापालिकेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे. भाजपला ठाकरे गटाच्या हातून सत्ता खेचायची आहे. त्यासाठी मुंबईत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष वाढताना दिसतोय.
दोन्ही बाजूने एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांप्रकरणी दोन्ही बाजूने न्यायालयीन लढाई देखील लढली जातेय. विशेष म्हणजे या न्यायालयीन लढाईतील एका प्रकरणात ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावलं आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर ठाकरे आणि राऊत कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ठाकरे आणि राऊत यांना समन्स का?
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काही मजकूर छापून आला होता. या मजकुरावर राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.
याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 14 जुलैला कोर्टात हजर राहावे, असा आदेश देण्यात आला आहे.
मुंबईत राजकारण तापलं
दरम्यान, ठाकरे गट विरुद्ध शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्ष चांगलाच तापताना दिसत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसा हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 1 जुलैला ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोविड सेंटरचं कंत्राट देण्यापासून ते अनेक वस्तूंच्या खरेदी-विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून केला जातोय. याप्रकरणी ईडीची कारवाईदेखील सुरु आहे. याच घडामोडींवरुन दोन्ही बाजूने आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.