राज्यात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, व्हाट्सअॅप स्टेटसवर औरंगजेबचा फोटो
Hindutva organizations : राज्यात मागील आठवड्यात तणावाचे वातावरण होते. आधी अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तणाव निर्माण करण्यात आला होता. आता नवी मुंबईत त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मागील आठवड्यात दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत याच कारणावरुन तणाव निर्माण झाला होता. आता नवी मुंबईत अशाच प्रकार झाला.
काय झाले नवी मुंबईत
नवी मुंबईच्या वाशी सेक्टर १७ येथील एका खासगी ठिकाणी काम करणारा ‘मोहम्मद हनिफ’ या समाजकंटकाने whatsapp स्टेटसवर औरंगजेबचे स्टेटस ठेवले. या माध्यमातून त्याने हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाचे उद्गातीकरण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या. त्याचे हे स्टेटस नवी मुंबईत व्हायरल होताच नवी मुंबईतील सकल हिंदू समाजाने मध्यरात्री वाशी पोलीस स्टेशन येथे धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची आणि आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
आंदोलनाचा इशारा
मोहम्मद हनिफ या माथेफिरुला अटक करावी, नवी मुंबईत देखील पोलीस प्रशासन व सायबर पोलिसांनी अशा समाजकंटकांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर वाशी पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात घेतले.
कोल्हापूर वरणगे पाडळी (ता. करवीर), इचलकरंजी येथील कबनूर, खोतवाडी या ठिकाणी मागील आठवड्यात तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा प्रकारामुळेच तणाव होता. या प्रकारानंतर कोल्हापूरमध्ये ३६ जणांना अटक करण्यात आली होती. कोल्हापुरातील इंटरनेट सेवाही बंद होती. तोच प्रकार नवी मुंबईत करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तरुणाला ताब्यात घेतले.