ती अटरली बटरली गर्ल आठवतेय?; ‘अमूल गर्ल’चे जनक, प्रसिद्ध अॅड गुरूने घेतला जगाचा निरोप
अमूलच्या जाहिरातीतील अटरली बटर्ली गर्लचे जनक, प्रसिद्ध अॅड गुरू सिल्व्हेस्टर दा कुन्हा यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला.
मुंबई : तुम्हाला अमूलची जाहिरात पाहिलीच असेल. त्या जाहिरातीवरील अटरली बटरली अमूल गर्ल आठवतेय का? या अमूल गर्ल पहिल्यांदा जगासमोर आणणारे आणि तिला घराघरात लोकप्रिय करणारे अॅड गुरू सिल्व्हेस्टर दाकुन्हा यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मंगळवारी रात्री मुंबईत त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे एमडी जयेन मेहता याांनी ट्विट करून दाकुन्हा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. दाकुन्हा यांच्या निधनाने जाहिरात क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिल्व्हेस्टर दाकुन्हा यांनी 1966मध्ये अमूल गर्लच्या जाहिरातीची आयडिया मांडली होती. त्यानंतर सफेद आणि लाल रंगाच्या डॉटेड फ्रॉकमध्ये अटरली बटरली गर्ल जाहिरातीतून सर्वांसमोर आली. या जाहिरातीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. ही अटरली बटरली अमूल गर्ल प्रत्येक घराघरात पोहोचली होती. अमूल म्हणजे अटरली बटरली गर्ल असं आजही समीकरण आहे. या ब्रँडला देशातच नव्हे तर विदेशातही ओळख मिळाली होती. विशेष म्हणजे इतक्या दीर्घ काळापर्यंत चालणारी अमूल गर्लची जाहिरात ही जगातील एकमेव जाहिरात आहे.
कॅची हेडिंग
अमूल गर्लची जाहिरात लोकप्रिय होण्यामागचं कारण म्हणजे वन लाईनर हेडिंग. अटरली बटरली अमूलमधून आधुनिकता दर्शवली जायची. शिवाय त्यांच्या वन लाईनरमुळे ही जाहिरात प्रत्येकाच्या मनात घर करून जायची. ही वन लाईनर या जाहिरातीची खासियक होती. त्यामुळेच अमूल ब्रँड सातत्याने लोकप्रिय आणि चर्चेत राहिला.
मुलाच्या हाती सूत्रे
दरम्यान, सिल्व्हेस्टर यांचे चिरंजीव राहुल दाकुन्हा हे वडिलांची जाहिरात कंपनी चालवत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दाकुन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या प्रतिभेचं मुक्तकंठाने कौतुक केलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी सिल्व्हेस्टर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच सिल्व्हेस्टर हे जाहिरात क्षेत्रातील गुरू असल्याचं म्हटलं आहे.
अजूनही जाहिरात सुरू
अमूल गर्ल कँपेन सुरू झाल्यानंतर तीन वर्षानंतर गर्सन आणि सिल्व्हेस्टर बंधूंनी 1969मध्ये दाकुन्हा कम्युनिकेशन्सची स्थापना केली होती. 2016मध्ये या अभियानाला 50 वर्ष पूर्ण झाले होते. एवढ्या दीर्घ काळ चाललेली ही जगातील एकमेव जाहिरात आहे. विशेष म्हणजे ही जाहिरात एवढी वर्ष चालूनही प्रत्येक पिढीत लोकप्रिय आहे. आता सिल्व्हेस्टर यांचे चिरंजीव ही कंपनी चालवत आहेत.