क्रिकेट क्लबच्या मुख्यालयातील इम्रान खानचा फोटो झाकला!
मुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खानचा फोटो लावण्यात आला होता. इम्रान खानचा हा फोटो झाकण्यात आला असून, लवकरच तो काढून टाकण्यावरही विचार केला जात आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे सचिव सुरेश बफना यांनी यासंदर्भात माहिती दिली. “सीसीआयच्या मुख्यालयात जगभरातील माजी खेळाडूंचे फोटो लावण्यात […]
मुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खानचा फोटो लावण्यात आला होता. इम्रान खानचा हा फोटो झाकण्यात आला असून, लवकरच तो काढून टाकण्यावरही विचार केला जात आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे सचिव सुरेश बफना यांनी यासंदर्भात माहिती दिली.
“सीसीआयच्या मुख्यालयात जगभरातील माजी खेळाडूंचे फोटो लावण्यात आले आहेत. यात 1992 सालच्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहिलेल्या इम्रान खानचाही फोटो आहे. मात्र, इम्रान खानचा फोटो झाकून, आम्ही पुलवामा हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे.”, असे सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदाणी यांनी म्हटले आहे.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात ‘पोरबंदर ऑल-राऊंडर’ नावाचं रेस्टॉरंट आहे. त्यातील भिंतीवर क्रिकेटर्सचे पोट्रेट आहेत. त्यात इम्रान खानचाही फोटो आहे.
#Visuals: Cricket Club of India covers Imran Khan’s photo at CCI Headquarters in Mumbai in wake of #PulwamaAttack. pic.twitter.com/H1Ymk71sfA
— ANI (@ANI) February 17, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभर नाराजी आहे. पुलवामा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेची पाळंमुळं पाकिस्तानात आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात भारतीयांची नाराजी आणि संताप सहाजिक आहे. हेच लक्षात घेऊन क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने मुख्यालयात असणारा इम्रान खानचा फोटो झाकला आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर इम्रान खान दोन सामने खेळला आहे. या मैदानात 1989 साली नेहरु कपमध्ये पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्त्वात विजय मिळवला होता. या सामन्यात इम्रान खान ‘मॅन ऑफ द मॅच’ही ठरला होता. नेहरु कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा पराभव केला होता.
पुलवामा हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.