अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार; ‘बार्ज पी- 305’ वरील 89 कर्मचारी अद्यापही गायब
अद्याप 89 कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. | Bombay High Barge P305
मुंबई: अरबी समुद्रात बॉम्बे हाय फिल्डच्या परिसरातील ‘बार्ज पी- 305’ (Barge P305) वरून गायब असलेल्या 89 कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही नौदलाकडून सुरुच आहे. या बार्जवर एकूण 273 कर्मचारी होते. यापैकी 184 जणांना नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले आहे. तर आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप 89 कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Indian Navy crew from Barge P305 off the coast of Mumbai rescued out of INS Kochi)
तौत्के चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय परिसरात असणारे ‘बार्ज पी- 305’ बुडाले होते. त्यामुळे या बार्जवरील सर्व कर्मचारी समुद्रात पडले होते. 17 तारखेलाच या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत 184 कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी GAL Constructor बार्जवर अडकलेल्या 137 कर्मचाऱ्यांचीही सहीसलामत सुटका केली.
कर्मचाऱ्यांनी 11 तास समुद्राच्या पाण्यात काढले
INS कोचीवरुन 125 जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर 65 जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.
“बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी 11 तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले” असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा याने सांगितले.
संबंधित बातम्या :
(Indian Navy crew from Barge P305 off the coast of Mumbai rescued out of INS Kochi)