Dada Bhuse | असं काय घडलं की दादा भुसे सुषमा अंधारे यांना म्हणाले, ‘ताई पाणी प्या!’
सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 300 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोप ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. 300 कोटींच्या ड्रग्जच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी प्रशासनाला फोन केला होता. पण ससून रुग्णालय प्रशासनाने ललित पाटील याला दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. खरी माहिती समोर येईल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यानंतर आम्ही दादा भुसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांनंतर आम्ही सुषमा अंधारे यांची सविस्तर भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अंधारे यांनी यावेळी भुसे यांच्यावरील आरोपांप्रकरणी गृह खात्याने सखोल तपास करावा, अशी मागणी केली. त्यांची प्रतिक्रिया सुरु असतानाच आम्ही दादा भुसे यांची लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुषमा अंधारे आणि दादा भुसे समोरासमोर आले.
दादा भुसे म्हणाले, ‘चौकशी करा’
दादा भुसे यांनी आपण सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं. आपली याप्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करा. यासाठी माझे फोन रेकॉर्डही चेक करा किंवा माझ्या आजूबाजूच्या इतरांचे फोन चेक करा. ज्यांना फोन केला असा दावा केला त्यांचे कॉल रेकॉर्ड करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी करा, असं दादा भुसे म्हणाले.
“चौकशीत काहीच आढळलं नाही तर सुषमा अंधारे यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी. दादा भुसे एवढा मोठा कार्यकर्ता नाही की माझी माफी मागावी. सुषमा अंधारे यांच्या आरोपांमुळे मालेगावकर नागरिकांचं मन दुखावले आहे. त्यामुळे त्यांनी मालेगावकरांची माफी मागावी”, असं दादा भुसे म्हणाले. दादा भुसे यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांना खोकला यायला लागला. तरीही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
दादा भुसे म्हणाले, ‘ताई पाणी प्या’
दादा भुसे यांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “दादासाहेब काय बोलले ते मी ऐकलेलं आहे. मला असं वाटतं ते चौकशीला तयार आहेत”, असं म्हणत असताना सुषमा अंधारे यांना जोराचा ठसका आला. त्यांनी बोलण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण त्यांना खोकला येत होता. यावेळी दादा भुसे सुषमा अंधारे यांना “ताई पाणी प्या. ताई, काळजी घ्या”, असं म्हटलं. यानंतर पुढचं संभाषण होऊ शकलं नाही. सुषमा अंधारे यांना खोकला येत असल्याने त्यांनी थोड्या वेळाने प्रतिक्रिया देते, असं सांगितलं.