अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोडदौड जबरदस्त वेगात सुरुच आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची घोडदौड जबरदस्त वेगात सुरुच आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अतिशय महत्त्वाची घडामोड घडलीय. मुंबईच्या भायखळ्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांना या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये दगडी चाळीतील अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) यांच्या भावाचादेखील समावेश आहे.
दगळी चाळीतील डॉन अरुण गवळी यांचा भाऊ प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शनिवारी रात्री उशिरा दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
“सहा-सात महिन्यात बाळासाहेबांच्या विचारांचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. खरं म्हणजे मी सगळ्यांचे स्वागत करतो. हे सरकार सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. या राज्याला पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे. गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“अनेक महत्त्वाची कामं आहेत. कोळीवाडा डेव्हलपमेंट आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतींचा धोकादायक प्रश्न आहे. जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेत त्यांना मुंबईत परत आणण्याचे काम देखील आपले सरकार करणार आहे”, असंदेखील शिंदे म्हणाले.
सोलापुरात भाजपसह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
दुसरीकडे सोलापुरात भाजपासह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे आता सोलापूरच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार की नाही ते आता आगामी काळातील निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होणार आहे. माजी आमदार रविकांत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.