Vinod Tawade: दौरा द्रौपदी मुर्मुंचा, चर्चा मात्र विनोद तावडेंची, राज्याच्या राजकारणात पुन्हा वाढले तावडेंचे महत्त्व?
गुरुवारी मुंबई दौऱ्यात द्रौपदी मुर्मु या मातोश्रीवर जाणार का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या सगळ्यात मातोश्रीशी विनोद तावडे हे संपर्कात असून, मुर्मु यांचा मातोश्री दौरा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दिवसांनी यानिमित्ताने विनोद तावडे यांची राजकीय चर्चा यानिमित्ताने झाली. राज्याच्या बदलत्या राजकारणात विनोद तावडे यांचे महत्त्वही वाढत असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
मुंबई – एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांच्या मुंबई दौऱ्यात चर्चा मात्र जास्त झाली ती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांची. द्रौपदी मुर्मु यांच्यासोबत मुंबईत भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत वावरत असलेल्या तावडेंचा आत्मविश्वास परतल्यासारखा वाटत होता. खासदारांच्या मागणीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राष्ट्रपतीपदासाठी मुर्मु यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर गुरुवारी मुंबई दौऱ्यात द्रौपदी मुर्मु या मातोश्रीवर जाणार का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या सगळ्यात मातोश्रीशी विनोद तावडे हे संपर्कात असून, मुर्मु यांचा मातोश्री दौरा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दिवसांनी यानिमित्ताने विनोद तावडे यांची राजकीय चर्चा यानिमित्ताने झाली. राज्याच्या बदलत्या राजकारणात विनोद तावडे यांचे महत्त्वही वाढत असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
Received and greeted NDA’s Presidential Candidate Smt Droupadi Murmu ji at Mumbai Airport with CM Eknathrao Shinde & @BJP4Maharashtra leaders this evening. @mieknathshinde pic.twitter.com/7bOLvqekGA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2022
उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध
एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यानंतर झालेला शपथविधी, यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोडे एकाकी पडले आहेत. अशात भाजपाकडूनही त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्यासाठीच विनोद तावडे हे मूर्मु यांच्या मातोश्री भेटीसाठी शिवसेना नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते आहे. उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ठाकरे आणि भाजपा यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्याची जबाबदारी तावडेंवर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्यातही घेतली होती भेट
नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या घेतलेल्या गळाभेटीचे फोटोही समोर आले होते. भाजपामधील बदलत्या राजकारणाचे संकेत त्यानिमित्ताने समोर आले होते.
विधानसभेला तिकिट नाकारले नंतर संघटनात्मक जबाबदारी
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्रालय विनोद तावडेंकडे सोपवण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात काही कारणांमुळे त्यांचे मंत्रिपद अखेरच्या काळात काढून घेण्यात आले. आणि शिक्षणमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यानंतर वर्षभरापूर्वी विनोद तावडे यांना राष्ट्रीय चिटणीसपदी नेमण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद महाजनांनतर पहिल्यांदाच अशी जबाबदारी भाजपात एका मराठी नेत्यावर सोपवण्यात आलीय. आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या मुंबई दौऱ्याची जबाबदारी तावडेंवर सोपवण्यात आली होती. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात विनोद तावडेंचे महत्त्व पुन्हा वाढीला लागल्याचे दिसते आहे.