वरळीतील आमदार कोण ते ठरवा, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ… शिंदे गटाच्या मंत्र्याचा ठाकरे गटाला टोला
मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत जे काही प्रकल्प सुरु होतील तेथील प्रकल्पग्रस्तांना त्याच परिसरात घरे देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. तर, मुंबईतील आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली. मात्र, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाला टोलाही लगावला.
मुंबई । 19 जुलै 2023 : मुंबईच्या वरळीतील गणपतराव कदम मार्ग, केशवराव खाडे मार्ग, डॉ. ई मोझेस मार्ग, ना. म. जोशी मार्ग येथील रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र, या रस्ता रुंदीकरणामुळे सुमारे 1800 घरे बाधित झाली आहेत. या बाधित कुटुंबाना विश्वास घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे. त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नादरम्यान केली. रस्ता रुंदीकरणमध्ये बाधित होत आहेत त्यांचे पुनर्वसन कुठे करणार? जे विस्थापित होत आहेत त्याबाबत शासन काय निर्णय घेणार याचा निर्णय घेण्यासाठी आमदारांची एक समिती बनविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार सुनील शिंदे यांच्या या मागणीला पाठिंबा देताना आमदार सचिन अहिर यांनी वरळीतील हे आद्य नागरिक आहेत. रस्ता रुंदीकरणात ज्या इमारती बाधित होणार आहेत त्या म्हाडा उपकार प्राप्त इमारती आहेत. त्यामुळे त्यांना हटविण्यास तसा अधिकार नाही. आधी त्यांचे पुनर्वसन कुठे करणार याचे उत्तर शासनाने द्यावे मग विकास करावा. या रहिवाशांना न्याय कसा देणार हे शासनाने स्पष्ट करावे असे सांगितले.
शासनाने या रहिवाशांना तातडीने नोटीस दिल्या. त्यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांनी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविली. त्याला लाखो नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे हा निर्णय स्थगित करणार का? असा सवाल त्यांनी केला. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सदर परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम दोन वर्षांनी सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले.
22 इमारतीमधील सुमारे 786 लोक बाधित होणार आहेत. या परिसरात जागा असल्यास त्यांचे तेथेच पुनर्वसन करण्यात येईल. सदर कामाला स्थगिती देण्याचे कारण नाही. तसेच येथे पोलिस, महापालिका कोणतीही कारवाई करणार नाही. बाधितांना दुसरे घर किंवा गाळा दिला जाणार नाही तोपर्यंत कुणाचेही बांधकाम तोडले जाणार नाही, असेही मंत्री सामंत म्हणाले.
वरळीतील आमदार कोण ते ठरवा…
उद्धव ठाकरे गटाचे तीन आमदार वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर, सचिन अहिर आणि सुनील शिंदे असे दोन आमदार विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. हा प्रश्न वरळीचा आहे. सध्या वरळीत तीन आमदार आहेत. त्यामुळे येथील एक आमदार समितीमध्ये असेल. पण, तो आमदार कोण असावा हे ठरवा नाही तर आम्ही निर्णय घेऊ असा टोला त्यांनी लगावला.