‘तुम्ही हे जाहीरपणे सांगण्याची नैतिकता दाखवा’, केसरकरांचं ठाकरेंना ओपन चॅलेंज
"लोकप्रतिनिधींना भेटायचे नाही, त्यांच्यावर आरोप करायचे. ते सोडून गेल्यावर मग पैसे घेतल्याचा आरोप करायचा, तुमचा मुलगा दिवसभर खोटं बोलतो. तुम्ही आलिशान गाड्यांमध्ये फिरता. माझी तीन पिढ्यांची श्रीमंती आहे, पण मी 10 वर्ष जुनी गाडी वापरतो", अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत दिलेल्या निकालावर सविस्तर भूमिका मांडणार आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पण या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेना नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीकादेखील केलीय. “पक्षाची घटना ही पूर्णपणे लोकशाही विरोधात आहे असं स्वतः सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने सुद्धा म्हटलं आहे. उद्या जर भाजपा अध्यक्षांनी मोदींना काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर तो मान्य होईल का? तुम्ही आधी कबूल करा की तुम्ही १९९९ ची बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली पक्षाची घटना बदलली हे जाहीरपणे सांगण्याची नैतिकता दाखवा. तुम्ही २०१९ वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढलात मग ते कसं विसरून चालेल?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.
“लोकांना बोलवायचे, त्याची मोठी जाहिरात करायची. लोकांची दिशाभूल करायची. कोर्टाने अध्यक्षांना सांगितले की राजकीय पक्ष कोण आहेत हे तपासा. अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली आणि पक्ष कोणाचा आहे ते तपासले. तुम्ही पक्षाची आमसभा घेतली होती का? तुम्ही फोर्ज डॉक्युमेंट दिले होते. ते कागदपत्र खरे कसे आहेत ते कोर्टात सांगा. एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्यासाठी तुम्ही पक्षाची बैठक घेतली होती का? लोकमत तयार करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? तुमच्याकडे घटनातज्ज्ञ आहेत न्यायालयात जा. नागरिकांकडून दिशाभूल केली जात आहेत. सहानुभूतीवर राहू शकत नाही म्हणून दिशाभूल केली जात आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.
‘तुम्ही कोर्टात जा, आमच्या विरुद्ध लढा’
“लोकप्रतिनिधींना भेटायचे नाही, त्यांच्यावर आरोप करायचे. ते सोडून गेल्यावर मग पैसे घेतल्याचा आरोप करायचा, तुमचा मुलगा दिवसभर खोटं बोलतो. तुम्ही आलिशान गाड्यांमध्ये फिरता. माझी तीन पिढ्यांची श्रीमंती आहे, पण मी 10 वर्ष जुनी गाडी वापरतो. तुम्ही निघून जा म्हणून सांगितले होते. तुम्ही आणि भाजप एकत्र येणार होते. काही कारणास्तव तुम्ही एकत्र आला नाहीत. शरद पवार यांनी तुम्हाला सांगितलं आहे, खोटं बोलू नका. तुम्ही कोर्टात जा. आमच्या विरुद्ध लढा”, असं चॅलेंजही केसरकारांनी यावेळी ठाकरेंना दिलं.
“आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र व्हाव्हेत यासाठी मागणी केली होती. पण अध्यक्षांनी ती मान्य केली नाही आणि म्हणून आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. अध्यक्षांचा निर्णय मान्य नसेल तर हरकत नाही. तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आमची काहीही हरकत नाही. २०१२ नंतर आमच्या पक्षाची घटना बदलण्यात आली आहे. या बदल झालेल्या घटनेचा त्यांनी मान्यता घेतली नाही आणि म्हणूनच अध्यक्षांनी १९९९ सालाची घटनाच मान्य केली आणि निर्णय दिला”, असं केसरकर म्हणाले.
‘आतापर्यंत खोटारडेपणाच करत आले’
“पक्षाची घटना कोणती आहे ते अध्यक्ष ठरवणार असं कोर्टाने सांगितलं होतं. त्यामुळे अध्यक्षांनी १९९९ सालाच्या पक्ष घटनेप्रमाणे पक्ष कोणाकडे आहे ते तपासून व्हीप ठरवला गेला. पक्ष कोणाकडे आहे याचा निर्णय अध्यक्षांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार घेतला. ठाकरे गट लोकांमध्ये फक्त खोटं perception Create करत आहे. वारंवार खोटं बोलत आहेत. ते आतापर्यंत खोटारडेपणाच करत आले आहेत”, अशी टीका दीपक केसकर यांनी केली.