मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून अयोध्येत प्रचंड तयारी करण्यात आली आहे. जागोजागी पोस्टर लावण्यात आलं आहे. या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत असून कव्हरेजही होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्या दौऱ्याला निघाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत.
दोन दिवसापर्यंत अयोध्येचा दौरा केवळ शिवसेनेचा असल्याचं सांगितलं जात होतं. भाजपचे नेते या दौऱ्यात सामील होणार असल्याचं शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांनी सांगितलं नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रभू रामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही अयोध्येला जात असल्याचं सांगितलं गेलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला गेले. त्यांच्यासोबत भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन होते. तसेच भाजप नेते मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटेही होते. तोपर्यंतही देवेंद्र फडणवीस या दौऱ्याला येणार असल्याचं कुणालाच माहीत नव्हतं. मात्र, एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर आल्यावर त्यांनी नवी माहिती दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
देवेंद्र फडणवीस हे भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच थोड्यावेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून अयोध्येकडे जाण्यासाठी निघाले आहेत. अचानक फडणवीस यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे यांच्या अयोध्येच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अयोध्या आणि लखनऊमध्ये या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे यशस्वी झाल्यानेच भाजपनेही या दौऱ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. शिंदे-फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदार अयोध्येतील ज्या पंचशील हॉटेलमध्ये उतरणार आहेत, ते हॉटेल फुलांनी सजवण्यात आलं आहे. हॉटेलबाहेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लागले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावले आहेत.
आज आम्ही रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत, शरयू तिरावर महाआरती करणार आहे. चार ते पात हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यापूर्वीचे अयोध्या दौरे आणि आताचा अयोध्या दौरा यात फरक आहे. शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह आहे, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.