झिरवळ साहेब, फोटो प्लीज… महाराष्ट्रातच नव्हे तर जपानमध्येही नरहरी झिरवळ यांची क्रेझ; काय आहे किस्सा?
जपानमध्ये गेल्यावर अनेकांनी माझ्यासोबत विमानतळावर आणि हॉटेलात खूप फोटो काढले. तिकडेही मी प्रसिद्ध आहे असं म्हणावं लागेल, असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले.

मुंबई : राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अत्यंत साधी राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच शांत स्वभावाचे नेते म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. त्यांच्या पत्नी आजही शेतात काम करतात. त्यांचं उत्पन्नही अत्यंत तुटपूंज आहे. त्यांच्या या साधी राहणीमानामुळेच त्यांची महाराष्ट्रात प्रचंड क्रेझ आहे. त्यातच राज्यातील सत्तासंघर्षातील काळातील निर्णयामुळेही ते प्रसिद्धीस आले होते. पण नरहरी झिरवळ यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जपानमध्येही प्रचंड क्रेझ आहे. त्याचा अनुभव स्वत: नरहरळी झिरवळ यांना जपानमध्ये आला. त्यांनी जपान दौऱ्यातील हा अनुभव टीव्ही9 मराठीसोबत शेअर केला आहे.
माझ्या मतदारसंघातील निळहोंडी पाड्यातील पवार नावाचा व्यक्ती मला जपानमध्ये भेटला. जपानमध्ये गेल्यावर अनेकांनी माझ्यासोबत विमानतळावर आणि हॉटेलात खूप फोटो काढले. तिकडेही मी प्रसिद्ध आहे असं म्हणावं लागेल. जपानमध्ये काही लोकं विचारायचे आपण झिरवळ साहेब का? याचा अर्थ ते अंदाजाने ओळखत होते. काही लोकं मला झिरवळ साहेब प्लीज फोटो काढतो. मी इंडियन आहे. मी पुण्याचा आहे. मी अमक्या ठिकाणचा आहे, असं म्हणायचे. माझ्यासोबत फोटो काढायचे. याचा अर्थ झिरवळ तिथेही पोहोचले आहेत, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.




मंदिरातही नसेल एवढी स्वच्छता
नरहरी झिरवळ हे जपानमधील शिस्त आणि स्वच्छतेमुळे प्रचंड प्रभावीत झाले आहेत. जपानमधील शिस्त आणि स्वच्छतेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. जपानमध्ये मी वॉशरूममधले फोटो काढले. वॉशरुममध्ये रबरी फुलदाण्या नाहीत. ओरिजनल आहेत. म्हणजे मंदिरात काही ठिकाणी एवढी स्वच्छता नसते एवढी स्वच्छता तिथे असते, असं सांगतानाच हॉटेलच्या बाहेर पार्किंगमध्ये दोन माणसं चिमट्याने कागदाचा किंवा चॉकलेटचा एक एक तुकडा काढताना दिसले. हा कचरा ते डस्टबिनमध्ये टाकायचे. थोडीही घाण असू नये म्हणून प्रचंड काळजी घेत होते, असं ते म्हणाले.
शरीराला शिस्तच लावून घेतलीय
विकासात आपण पुढे आहोत असं म्हणतो. पण जपानचा विचार केला तर आपण 25 ते 30 वर्ष अजूनही मागे आहोत. त्यांना कोणी वेगळं काही सहकार्य करतं असं नाही. वेगळा माणूस येऊन विकास करतो असं नाही. तिथले माणसं स्वत: काही तरी करतात. माझ्यासाठी मी काय करावं? असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाने शरीराला शिस्त लावून घेतली आहे. आपल्याकडे आपण कीर्तन, भारूड सर्व करतो. नको त्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण हे करतो. व्यसनाधीनता कमी व्हावी म्हणून आपण झटतो. कायदे करतो. तिथे कायदा काय आहे माहीत नाही. पण तिथल्या लोकांनी स्वत:ला कायदा करून घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
तरच रस्ता क्रॉस
जपानमधील लोकांच्या शिस्तीचं उदाहरणच त्यांनी दिलं. उदाहरण सांगतो. तिथे दर 100 मीटरवर सिग्नल दिसतो. रस्त्याला पांढरे पट्टे आहेत. माणसांनाही रस्ता क्रॉस करण्यासाठीचे सिग्नल आहे. माणसाचा रस्ता क्रॉस करण्याचा सिग्नल पडल्यावरच तिथली लोकं रस्ता क्रॉस करतात. आपल्याकडे सिग्नल काय आहे हे पाहत नाही. लोक निघून जातात. सिग्नल रेड असेल अन् रस्त्यावर एकही गाडी नसेल तरी तिथला एकही माणूस निघून जात नाही. रस्त्यावर गाड्या वाहत नसतानाही सिग्नल पडेपर्यंत तो रस्ता क्रॉस करतच नाही, एवढी शिस्त त्या लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एकदाही हॉर्न ऐकला नाही
सिग्नलच्या शेजारी पट्टे मारलेले आहेत. 90 वर्षाचा माणूस वाहने नसताना रस्ता क्रॉस करून जाऊ शकतो. कारण तो वृद्ध आहे. पण जपानमधील 90 वर्षाचा माणूस तसं करत नाही. तो वाकत वाकत त्या पट्ट्यापर्यंत येतो, सिग्नल लागलेला असेल तरच रस्ता क्रॉस करतो. ही शिस्त त्यांनी स्वत:च स्वत:ला लावून घेतली आहे. तसं झालं तर अपघाताचं प्रमाण शून्य असेल. 11 दिवस तिथे होतो. तिथे गाड्यांचा हॉर्न वाजलाच नाही. हॉर्न असेल. पण वाजताना ऐकला नाही. तिथे प्रदूषण सांभाळलं जातं, असंही त्यांनी सांगितलं.
गाडीच्या चाकात चेहरा
आम्ही शंभर गाड्यांचं लक्ष ठेवलं होतं. पत्नीला म्हटलं तू लहान गाड्या मोज. मी मोठ्या गाड्या मोजतो. मी शंभर मोजल्यावर तुझ्या किती झाल्या ते सांगायचं असं पत्नीला सांगितलं. माझ्या शंभर झाल्यावर छोट्या गाड्या फक्त 13 झाल्या होत्या. पण 100च्या शंभर गाड्या अशा दिसायच्या की त्या शोरूममधून आणल्या. अगदी चाकाच्या डिस्कमध्येही माणूस चेहरा पाहू शकतो. भांग पाडू शकतो, एवढ्या गाड्या स्वच्छ आणि चकचकीत होत्या, असं ते म्हणाले.