‘शिवसेना, राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपच बॉस’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या विस्तारकांशी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी महायुतीमधील घटक पक्षांबाबत मोठं वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप हाच पक्ष सर्वांचा बॉस असेल, असं फडणवीस बैठकीत बोलल्याची माहिती समोर आलीय.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : भाजपची दादर येथे आज महत्त्वाची बैठक पार पडलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले. तसेच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं असतं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. शिवसेनेचा नेता मुख्यमंत्री असताना, तीन पक्षांचं एकत्रित सरकार असताना भाजप हाच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आगामी काळात खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात परिणामकारक ठरतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना यावेळी महत्त्वाचे आदेश देखील दिले आहेत. स्वतः साठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना दिले. तसेच फडणवीस यांनी विस्तारकांना पुढील एका वर्षाचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना दिल्या. यातून भाजपकडून निवडणूक जिंकण्यासाठी ग्राम पातळीवर मायक्रो प्लानिंग करण्यात येत असल्याचं दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस आहे. युती मधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. मी इथं उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे. राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर असेल”, असं देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.