अजित पवार यांचं ते बंडच नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गौप्यस्फोटांची मालिका
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या 'टीव्ही 9 मराठी'च्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विशेष म्हणजे त्यावेळी तयार झालेलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. याशिवाय त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सरकार स्थापन केलेलं. पण अजित पवार यांचं ते बंड होतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
“पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं का? इथूनच सुरुवात होईल. मला असं वाटतं की, तुमच्याकडे अजित दादा येवून गेले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर नो कमेंट्स केलंय. त्यामुळे काही करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथविधी घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“अजित दादा आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्याबद्दल शपथ घेतली होती ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती ही गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या, ते कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट नेमका काय?
पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीवर आणखी काय-काय म्हणाले?
माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया.
राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता.
तुम्ही पहाटेच्या शपथविधीवर सकाळ, पहाटे किंवा अर्ध्या रात्रीचं म्हणा. काय फरक पडतो? भूतकाळ हा भूतकाळ आहे. पण त्यानंतर या दोघांनी आमच्यासोबत जी वागणूक केली होती, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली, त्यांच्या पक्षात कुरबुरी झाल्या. त्यांचे लोकं बाहेर पडले. त्यांना माहिती हे मान्य नव्हतं की कशाप्रकारे हे सरकार चालतंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार चालत नाही.
आम्हाला गुदमरतंय, असं त्यांना वाटत होतं. त्याचा आम्ही मौका घेतला. आम्ही त्यांना सोबत घेतलं. आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. मी तर असं म्हणतो एकदम नैसर्गिक सरकार आहे. कारण या सरकारमधील जे लोक आहेत त्यांनी एकमेकांसाठी मतं मागितली होती. त्यामुळे मी बदला हा शब्द वापरला होता. तुम्ही मला जे दिलं ते व्याजासहीत परत केलं.