Lalit Patil Case | महाराष्ट्राच्या राजकारणात वादळाचे संकेत, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा इशारा
ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिलाय.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या हाती लागलाय. मुंबई पोलिसांनी त्याला बंगळुरु येथून अटक केलीय. त्याला अटक केल्यानंतर त्याने धक्कादायक दावा केलाय. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवलं गेलं होतं. मी सर्व गोष्टींचा खुलासा करणार, असं ललित पाटील याने म्हटलं आहे. ललित पाटील याच्या या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन मोठा दावा केलाय.
ललित पाटील याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी पोलीस त्याला कोर्टाच्या बाहेर घेऊन आले तेव्हा त्याने मी ससूनमधून पळालो नाही तर मला पळवं गेलं, असं स्पष्ट म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ललित पाटील याच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार असून बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप
ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात 9 महिन्यांपासून उपचार घेत होता. त्याला ससूनमध्ये ठेवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यावर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. ललित पाटील याला ससूनमधून पळवण्यासाठी कोणी गाड्या दिल्या? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. तर ललित पाटील याला मॅनेज करुन पकडण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस यांचा नेमका इशारा काय?
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन मोठा दावा केलाय. “मुंबई पोलिसांनादेखील नाशिकमधील ड्रग्ज कारखान्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या कारखान्यावर धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे कामे करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. त्याच्या चौकशीतून निश्चितपणे मोठं नक्सेस बाहेर येईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काही गोष्टी मला आता ब्रीफ झाल्या आहेत त्या मी तुम्हाला आता लगेच सांगू शकत नाही. मी योग्यवेळी तुम्हाला सर्व सांगेन. पण एवढंच सांगतो, एक मोठा नेक्सेस आम्ही यातून बाहेर काढणार आहोत. ललित पाटीलनंतर तो काय बोलतो यापेक्षा जे काही नेक्सेस यातून बाहेर निघणार आहे, त्यातून सर्वांची तोंडे बंद होतील”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
ललित पाटील प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत
- दरम्यान, ललित पाटील प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ललित पाटील याला ससून रुग्णालयाने कोणत्या आजारासाठी रुग्णालयात 9 महिने ठेवलं?
- एखादा ड्रग्ज माफिया सलग 9 महिने काय उपचार घेतोय याची माहिती पोलिसांना नव्हती का?
- ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्जचा व्यापार चालवत होता, पुण्यातील मोठं रुग्णालय ड्रग्ज माफियांचं हेडक्वार्टर झाल्याचं पोलिसांना कसं कळलं नाही?
- कोणाच्या सांगण्यावरुन त्याचा ससून रुग्णालयातूल कालावधी वारंवार वाढवण्यात आला?
- ललित पाटील ससून रुग्णालयातून कसा पळाला? पळाल्यानंतर ललित पाटील चेन्नई कसा पोहोचला?
- ललित पाटीलला पळण्यासाठी किंवा ससूनमध्ये राहण्यासाठी कुणाची राजकीय मदत झाली का?