‘सीमाप्रश्नावर फक्त राजकारण’, देवेंद्र फडणवीस यांचा भाजप सत्तेत असलेल्या कर्नाटक सरकारवर निशाणा?
"गेल्या साठ वर्षात त्यांनी भूमिका बदलेली नाही आणि आपणही बदलेली नाही. त्यामुळे ते फार नवीन सांगत आहेत किंवा शोध लावत आहेत, असंही नाहीय", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : “सीमाप्रश्न कालच तयार झालाय, आमचं सरकार सहा महिन्यांपूर्वी आल्यामुळे सीमाप्रश्न तयार झालाय, अशा प्रकारचे वक्तव्य देणं चाललेलं आहे. माझा प्रश्न असाय की, आपणही सरकारमध्ये अडीच वर्ष होता, काय केलंत? हा प्रश्न सोडवण्यासाठी काही काम केलं का?’, असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेवरदेखील प्रतिक्रिया दिली.
“ते (कर्नाटक सरकार) त्यांची भूमिका बदलणार नाहीत. आपण आपली भूमिका बदलणार नाहीत. यावर चर्चेतून मार्ग निघेल. किंवा सुप्रीम कोर्टात मार्ग निघेल. कारण गेल्या साठ वर्षात त्यांनी भूमिका बदलेली नाही आणि आपणही बदलेली नाही. त्यामुळे ते फार नवीन सांगत आहेत किंवा शोध लावत आहेत, असंही नाहीय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्राची बाजू कर्नाटकापेक्षा जास्त भक्कम आहे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे. ते न्यायालयात त्यांची बाजू मांडतील. आपण आपली बाजू मांडू. आम्ही बाजू मांडतोय यावरुनच समजतेय की आमती बाजू भक्कम आहे. पण ते न्यायालयाला ठरवू द्याना की कुणाची बाजू भक्कम आहे. या संदर्भात वाद निर्माण करण्याचं कारण काय?”, असा सवाल फडणवीसांनी केला.
“सीमाप्रश्नाचा वाद वर्षानुवर्ष चाललाय. हे प्रकरण गंभीर आहे. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा समस्येवर कधीच राजकारण झालेलं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तिकडे कर्नाटकात आमच्या मराठी बांधवावर अन्याय झाला, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. सगळे एकत्रितपणे विधानसभेत एकत्रित येऊन प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. पण सध्या वातावरण निर्मिती करण्याचं कारस्थान सुरुय. सीमाप्रश्नच्या गंभीरतेपेक्षा राजकारण किती केलं जाईल, हा प्रयत्न सुरु आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली.