Tv9 EXCLUSIVE | ‘मी मनोज जरांगे यांना काहीच सांगणार नाही’; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्या गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. मराठा कुणबी आरक्षण सरसकट देणं शक्य आहे का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. राज्यभरात मराठा कार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. पण तसं करणं खरंच शक्य आहे का? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी फडणवीसांनी मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीवर सविस्तर भूमिका मांडली.
“जो कुणबी असेल त्याला नाकारता येणार नाही. चार पिढ्यांपूर्वी कुणबी असेल तर नाकारता येणार नाही. हैद्राबादच्या रेकॉर्डमध्ये आम्ही कुणबी आहोत, असं लिहिलंय असं त्यांनी म्हटलं, तो रेकॉर्ड शोधण्यासाठी समिती स्थापन केली. शिंदे समिती अहवाल देईल त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. एखाद्या समाजाला आरक्षण देताना ते टिकणारं असेल. समितीला कार्यकक्षा दिली आहे. त्यांना रेकॉर्ड सापडला आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कोर्टही सुनावणीला तयार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देणं ही आमची प्राथमिकता आहे. त्यावर आमचं कामही सुरू आहे. पहिल्यांदा त्यांच्याकडून सांगण्यात आलं, पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही देतो. पण कमिटीने पुरावे पाहणे सुरू केलं. त्यामुळे आहे त्या पुराव्यातून आपण कोर्टात टिकू शकत नाही हे समितीच्या लक्षात आलं. कोर्टात टिकण्यासाठी त्यांनी आणखी पुरावे गोळा करणं सुरू केलं. त्यामुळे समितीने दोन महिन्याची मुदत मागितली. त्यानुसार दोन का तीन महिन्याचं एक्स्टेंशन दिलं आहे. कमिटीला काही ठिकाणी गो बॅक झालं. असं कसं चालेल. समितीला काम करू द्या”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
‘मी जरांगेंना काही सांगणार नाही’
“मी जरांगेंना काही सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली आहे. ते कमिटेड आहे. मी स्वत सांगतो, मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण होण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“ज्यांनी काही केलं नाही ते आमच्यावर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पवार सोबत होते का मार्ग काढला नाही? समाजाचा प्रश्न आहे. ऐरणीवर आहे. समाज तो मांडत आहे. पण काही राजकीय पक्षांना ही संधी वाटते. ते आंदोलनकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवतात”, अशी टीका फडणवीसांनी केली.
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कधी आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मंडल कमिशनला शिवसेनेनच विरोध केला होता. आम्ही विरोध केला नव्हता. मराठा मोर्चाला मूक मोर्चा त्यांनीच म्हटलं. आता सोयीची भूमिका घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयात तुमच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. मांडा सोयीची भूमिका पण तुमच्या हाती असताना तुम्ही काही करून दाखवा”, असं फडणवीस म्हणाले.
तुम्ही आरक्षण कसं देणार?
“भोसले समिती निर्माण केली होती. या समितीने सांगितलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाने जे डेफिसीट पॉइंट आऊट केले. ते पूर्ण करण्याची संधीही कोर्टाने ऑर्डरमध्ये दिली आहे. केस पूर्ण रिप्रेझेंट झाली नाही. त्यामुळे तुम्ही क्युरेटीव्हमध्ये जा. क्युरेटिव्हमध्ये यश मिळाले नाही तर डेफिशीट दूर करण्याचा प्रयत्न केला. तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंचया काळात आला ते काहीच केलं नाही. आमच्या हातात रिपोर्ट येताच क्युरेटिव्ह केलं आहे”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“सरकार गांभीर्याने काम करत आहे. त्यांनीही सरकारसोबत काम केलं पाहिजे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे,. लोकशाहीने आयुध दिलं. त्यात उपोषण आहे. आम्ही गांभीर्याने घेतलं. चर्चाच झाली नाही तर कसं होईल. चार आयडिया आमच्या असतील. चार आयडिया त्यांच्या असतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.