‘अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची सूट’, देवेंद्र फडणवीस यांचं महावितरणाला महत्त्वाच्या सूचना
कृषीपंपाचं बील भरलं नाही म्हणून महावितरणाकडून वीज कनेक्शन कापलं जातं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कृषीपंपाचं बील भरलं नाही म्हणून महावितरणाकडून वीज कनेक्शन कापलं जातं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्याचे बीलं घ्या, इतर वसूली नंतर घ्या. त्यांचं लगेच वीज कनेक्शन कापू नका, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना माहिती दिली.
“कृषीपंपा संदर्भात कायम वसूली चालूच असते. त्याबद्दल काही प्रमाणात तक्रारी येत होत्या की आमचं वीज कनेक्शन कापलं जातंय. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता आता रब्बीच्या पेरण्या किंवा नव्या पिकांसाठी प्रयत्न सुरु असतील, म्हणून मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की, जे बील भरु शकतात त्यांनी बील भरलं पाहिजे. पण जे अडचणीत आहेत त्यांनी सध्याचं बील जरी भरलं तरी त्यांना सूट देण्यात यावी. त्यांचं वीज कनेक्शन तोडू नये, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वसूली करता येईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“अतिवृष्टी झालेल्या भागात सक्तीची वसुली करु नये, केवळ एक बील घेऊन विषय बंद करायला मी सांगितलं आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून गठीत करण्यात आलेल्या समितीविषयी माहिती देण्यात आली. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केस सुरुय. त्या संदर्भात काय सद्यस्थिती आहे, आपण काय-काय केलं पाहिजे, सीमा भागातील आपल्या नागरिकांना कशापद्धतीने सवलती दिल्या पाहिजेत, त्यांच्या पाठिशी कसं उभं राहीलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नव्या वकिलांची फौज आपण उभी करतोय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.