फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले उपायुक्तांच्या कार्यालयात
ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. | bruck pharma Devendra Fadnavis
मुंबई: कोरोनाच्या उपचारांमधये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या (Remdesivir injection) मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती. (Mumbai Police interrogate bruck pharma owner in remdesivir injection connection)
मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.
या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर राजेश डोकानिया यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ब्रूक फार्मा कंपनीकडे साठा पडून होता. भाजपच्या नेत्यांनी कायदेशीरपणे या इंजेक्शन्सची निर्यात महाराष्ट्रात व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पोलिसांचं म्हणणं काय?
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक
राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही बाब समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले. ते भाजपच्या नेत्यांसह थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. याशिवाय, त्यांनी झोन आठचे डीसीपी मंजुनाथ शिंगे यांच्याशी फोनवरुनही संपर्क साधला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही राजेश डोकानिया यांना अशाप्रकारे अटक करू शकत नाही, असे सांगितले. त्यांनी फक्त भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची (FDA) परवानगी होती. ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिल्याचाही पुरावा आमच्याकडे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
काय आहे सगळा प्रकार?
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. संबंधित बातम्या:
महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा
(Mumbai Police interrogate bruck pharma owner in remdesivir injection connection)