‘पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक’, जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपेगेंडा संपला आणि जगाने मान्य केलं की, कलम 370 हटवणं योग्य निर्णय आहे आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे", असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. हरियाणात भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेत येणार नाही, अशी सध्याची आकडेवारी सांगत आहे. निवडणूक निकालाच्या कलानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीरच्या निकालांवरही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जितक्या जागांवर भाजप जिंकत आहे ती देखील ऐतिहासिक जीत असल्याचा दावा भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“मी केवळ हरियाणाचं बोलणार नाही. मला कुणीतरी विचारलं की, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला. कारण जे लोकं म्हणत होते की, कलम 370 हटवल्यानंतर खून की नदीया बहेंगी, त्यांनी येऊन बघावं. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. जगभरातील मोठ्या देशांचे काऊन्सिल जनरल निरीक्षक म्हणून तिथे आले. त्यांनीदेखील सांगितलं की, इतक्या प्रमाणिक निवडणुका आम्ही कधी बघितल्या नाहीत. तशी निवडणूक आपण घेऊन दाखवली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सर्वात महत्त्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होतं की, भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे. तिथे लोकशाही नाही. जम्मू-काश्मीर भारताचा भाग नाही, त्या ठिकाणी फेअर निवडणूक होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपेगेंडा संपला आणि जगाने मान्य केलं की, कलम 370 हटवणं योग्य निर्णय आहे आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“जम्मू-काश्मीमध्ये सरकार कोणाचं बनतंय ते महत्त्वाचं नाही. आज जो जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाने मान्य केलं आहे. हा भारताचा विजय झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ज्याप्रकारे जनतेने पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही विजयाने मातणार नाहीत. या विजयाने आणखी नम्रता शिकवली आहे. या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढवला आहे. जनतेची कामे करुन तुम्हाला वारंवार निवडणूक जिंकता येते हे सिद्ध झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.