मनोज जरांगे यांच्या विषप्रयोगाच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या जीवाना धोका आहे, आपल्याला सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
मुंबई | 1 मार्च 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या जीवाना धोका आहे, आपल्याला सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी जरांगे यांच्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
“मी उपाशी होतो. त्यामुळे ताबा सुटला असं जरांगे म्हणाले. सोडून द्या. जरांगे तर बिचारे नवीन आहेत. जेव्हा काही सापडत नाही तेव्हा शरद पवार साहेबही जातीवर जातात. संभाजीराजेंना तिकीट दिलं तेव्हा पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमत आहेत असं पवार म्हणाले होते. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही त्यामुळे जातीवरून आरोप होतात. पण जातीपातीत महाराष्ट्र अडकणार नाही”, अशा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘माझी जात लपली नाही’
“मी मागेही बोललो. माझी जात लपली नाही. मी लपवून ठेवली नाही. मला त्यात अपराध बोधही नाही. असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राने माझी जात मागे टाकली. महाराष्ट्राने मला स्वीकारलं. महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारलं. मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राने स्वीकारलंय,. कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं. कुणाला अधिकार आहे सर्टिफिकेट द्यायचा. शिंदे साहेब म्हणाले ते योग्य आहे. महाराष्ट्राने मला स्वीकारलंय. त्यामुळे मी राज्यातील प्रत्येक समाजासाठी लढणार आहे. एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार नाही. माझी जेवढी क्षमता आहे, तोपर्यंत मी काम करेन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगेंची आंदोलनस्थळी भेट का घेतली नाही?
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्याबाबत विचारलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नावरही उत्तर दिलं. सर्व नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घ्यायला गेले. पण तुम्ही गेला नाहीत. त्यामागील कारण काय? असा प्रश्न फडणीसांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. त्या ठिकाणची भावना होती. ती पाहता मी गेल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील असं वाटत होतं. लाठीचार्ज पोलिसांनी केला असला तरी होम डिपार्टमेंट माझ्याकडे येतो. त्यामुळे मी गेलो नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी मुख्यमंत्र्यासोबत करत होतो”, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. “मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनीच सर्व गोष्टी हँडल करायचे असतात. आम्ही त्यांना मदत करायची असते. माझा जो पूर्वीचा अनुभव होता, त्याबाबतची मदत मी त्यांना केली आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो. त्यांनी घेतला”, असं फडणवीस म्हणाले.