‘शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया द्यावी लागते’, देवेंद्र फडणवीस यांनी उडवली खिल्ली
"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावी लागते", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सीमावाद, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली.
“खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लक्षात आलं की, आपल्यासमोर घटना घडली. आपण त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते छत्रपती उदयनराजेंनी नमूद केल्यानंतर आज शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावी लागते”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली.
“मला असं वाटतं की, एक राजकीय रंग कसा देता येईल, याचा प्रयत्न सुरु आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करुन राजकारण करणं योग्य होणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे काय बोलले मी ऐकलेलं नाही. ते काय बोलले मी प्रतिक्रिया देणार नाही. पण उदयनमहाराजांच्या पत्रामुळे ते खळबळून जागे झाले आहेत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
“माझा त्यांना सवाल आहे, आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकार होतं. तेव्हा प्रश्न सुटला का? कर्नाटकमध्येही वेगवेगळ्या पक्षाची सत्ता होती. पक्षाचा वाद हा सीमावादात आणू नये”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर सुरु असलेल्या राजकीय वादावर दिली.