कारसेवा करताना खांद्यावरुन गोळ्या जाताना पाहिलं, तुरुंगवासही भोगला : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने टीव्ही 9 मराठीशी खास बातचित केली (Devendra Fadnavis share Karseva experiences).
मुंबई : महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने टीव्ही 9 मराठीशी खास बातचित केली (Devendra Fadnavis share Karseva experiences). यावेळी त्यांनी आपल्या कारसेवेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यात त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून प्रत्येक कारसेवेत सहभागी झाल्याचं आणि याचसाठी तुरुंग पाहिल्याचं सांगितलं. तसेच या काळात 3 अंश सेल्सिअस तापमानात झोपल्याचं आणि खांद्यावरुन गोळ्या जाताना पाहिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी निकाल आला तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. इतक्या वर्षांच्या संघर्षातनंतर यश आलं. जेथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेथे मंदिर होत आहे. उद्याचा सोहळा याची देही, याची डोळा पाहायला मिळाला याच्या इतका दुसरा मोठा आनंद नाही. मी वयाच्या 20 व्या वर्षी 30 सप्टेंबर 1989 ला पहिल्यांदा कारसेवेसाठी गेलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना राम शिला पूजेचं यजमानपद घेण्यास सांगितलं होतं. तेव्हा अखिल भारतीय परिषदेचा गट घेऊन उत्तर प्रदेशमध्ये गेलो. आम्हाला देवरा बाबांकडून पुढील सुचना मिळणार होत्या. तेव्हा आम्ही आनंदभवन येथे नेहरुंच्या घराच्या लॉनवर बसलो.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“आम्ही देवरा बाबांकडून माहिती घेतली. मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद असल्याचं सांगितलं. तसेच सत्याग्रह करत अटक द्यायची असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी मात्र अटक होऊन घेणार नाही असं सांगितलं. आम्ही एका बाबांच्या आश्रमात 5-6 दिवस राहिलो. तिथं 3 अंश सेल्सिअस तापमान असायचं. आम्ही शंकराचार्यांसोबत पायी निघालो. आम्हाला गंगेवरील एका पुलावर थांबवण्यात आलं. तेथे लाठीचार्ज झाला. शंकराचार्यांना अटक करण्यात आलं. तेव्हा खांद्यावरुन बंदुकीच्या गोळ्या जाताना पाहिलं. असं आधी कधी पाहिलं नव्हतं,” असंही त्यांनी नमूद केलं.
“जेथे तुरुंगात ठेवलं त्याच्या तुरुंगाधिकाऱ्याची मुलंही कारसेवेत सहभागी”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जवळपास 14-15 दिवस आम्ही बदायुच्या तुरुंगात होतो. तेथे आम्ही रामाचं नाम घ्यायचो आणि कैद्यांनाही रामाचं नाम घ्यायला लावायचो. आम्ही जेथे तुरुंगात होतो, त्या तुरुंगाच्या जेलरची दोन्ही मुलं कारसेवेसाठी गेले होते. त्यामुळे त्यांनाही आम्ही आल्याचा आनंद झाला. घरच्यांना प्रचंड काळजी वाटत होती. माझ्या पायाला गोळी लागली अशीही अफवा घरच्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे घरचे अधिक काळजीत पडले होते.”
“अयोध्येवरुन येताना अडीच दिवस प्रवास, अनेक ठिकाणी मारामाऱ्या”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कारसेवेच्यावेळी लाखो लोक जमा झाले होते. तेव्हा एक मुठ वाळू एका ठिकाणी टाकायची असं सांगण्यात आलं. त्यावेळी काही लोक अचानक त्या ढाच्याकडे पळाले आणि त्यांनी तो तोडण्यास सुरुवात केली. काही लोकांनी राखीव पोलिसांना अडवण्यासाठी पुढाकार घेतला. तो उन्माद दुसऱ्या धर्माच्या विरोधात नव्हता, तर राम मंदिरासाठीची भावना होती. सर्व कारसेवकांनी रात्रीतून मंदिर बांधलं होतं. आम्ही मंदिराकडे जात असताना पोलिसांनी हटकलं. त्यानंतर आम्हाला धर्मेंद्र महाराजांनी अयोध्या सोडायसा सांगितली. त्यानंतर आम्ही अडीच दिवस प्रवास करत होतो. या प्रवासात अनेक ठिकाणी रेल्वे थांबत होती, थांबेल तेथे मारामाऱ्या झाल्या.”
“तिसऱ्यांदा आमदार असतानाही कारसेवा केली, 30 किमी प्रवास केला”
फडणवीस म्हणाले, “मी तिसऱ्यांदा आमदार असतानाही कारसेवेला गेलो होतो. तेव्हा बिनातिकिट जायचं असं ठरलं होतं. तेव्हा लखनौच्या रेल्वे स्टेशनवर झोपून 30 किमी पायी प्रवास केला. राम मंदिराच्या प्रत्येक कारसेवेत मी सहभागी झालो होतो. ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी 20 व्या वर्षी तुरुंग पाहिलं, ते मंदिर आज उभं राहतं याचा मला खूप आनंद आहे.”
“आमच्यासाठी हा राजकीय विषय नव्हता, तर अस्मितेचा विषय होता. हे आंदोलन भाजपने नाही तर विश्व हिंदू परिषदेने सुरु केलं होतं. आमच्यासाठी हा एका धार्मिक वास्तूचा विषय नव्हता. हिंदू धर्मात दुसऱ्या धर्माच्या इमारतीवर हल्ला केला जाऊ शकत नाही. आम्हाला जे माहिती होतं की ती राम जन्मभूमी आहे आणि तेथे प्रभू श्रीरामांचं मंदिर हवं ही आमची इच्छा होती. त्यासाठीच आम्ही कारसेवा केली,” असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत भूमिपूजन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील नागरिकांनी कोरोनाचा विचार करुन आहात तेथेच आनंद साजरा करावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
संबंधित व्हिडीओ :
हेही वाचा :
“राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस बदला, अन्यथा जीवे मारु”, मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्याला धमकी
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत!
Devendra Fadnavis share Karseva experiences