बालबुद्धीवर काय बोलणार?, देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका का?
जी वाघ नखं आणली जात आहेत, ती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? ही वाघ नखं कर्जावर आणणार आहात की कायमस्वरुपी? असे सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 ऑक्टोबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं ( tiger claw ) महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. लंडनमधून ही वाघ नखं आणली जाणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचारले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा चांगलाच तिळपापड उडाला आहे. आदित्य ठाकरे यांनी सवाल करताच त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. फडणवीस यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पुरावे मागणं ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मी बालबुद्धीवर काय बोलणार?, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मनं साफ करून घ्या
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक पार पडली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तर काय नवल आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती त्यानिमित्ताने इंडिया आघाडीने मार्चचं आयोजन केलं आहे. त्यावरही त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. या निमित्ताने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वतःची मनं साफ करून घ्यावीत, असा हल्ला त्यांनी चढवला.
वाघ नखं आणून काय करणार?
वाघ नखांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरी वाघनखं ही शिवसेना आहे. शिवसेनेने 55 वर्ष अत्याचाऱ्यांचा कोथळा काढला. तुम्ही ती वाघ नखं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका जवळ आल्यावर अशा कल्पाना डोक्यात येतात. महाराज त्यांचा इतिहास हा जगाला प्रेरणादायी आहे. ही वाघ नखं आणून काय करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही दिल्लीचे गुलामच ना?
वाघ नखं आणून तरी काय करणार? तुम्ही दिल्लीची गुलामीच करणार ना. एक प्रकारे वाघनखाचा अपमान करत आहात. तुम्ही दिल्लीची गुलामी करत आहात. महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त करायचं होतं. त्यामुळे त्यांनी दिल्लीचा कोथळा काढला, म्हणून शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली. तुम्ही गुलाम आहात. तुम्ही महाराष्ट्राला दिल्लीचं पायपुसणं करून ठेवलंय. गुलाम महाराष्ट्रात वाघनखं आणून महाराष्ट्राचा आणि वाघनखांचा अपमान करत आहात, असा हल्लाही राऊत यांनी चढवला.