मुख्यमंत्र्यांचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; फडणवीसांचा टोला
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. (devendra fadnavis slams cm uddhav thackeray over corona issue)
नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams cm uddhav thackeray over corona issue)
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली.
नियम होता कामा नये
लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
आव्हाडांना विस्मरणाचा रोग
यावेळी फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केलं. पण या सरकारने काहीच केलं नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारं हे एकमेव सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis slams cm uddhav thackeray over corona issue)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/ZAAVHGIxAZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी, संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?
‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
(devendra fadnavis slams cm uddhav thackeray over corona issue)