गोळीबाराच्या घटनांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत महत्त्वाचं उत्तर
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणि अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर नेमका काय तपास झाला, तसेच याबाबतच्या आरोपांवर आज विधान परिषदेत भूमिका मांडली.
विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 1 मार्च 2024 : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी लोकप्रतिधींशी संबंधित दोन गोळीबाराच्या घटना समोर आल्या. पहिली घटना ही कल्याणमध्ये घडली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. तर दुसरी घटना ही दहिसरला घडली. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मॉरीसने देखील स्वत:ला गोळ्या झाडत संपवलं. या दोन घटनांवरुन सत्ताधारी शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात होता. विरोधी पक्षांकडून या घटनांवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली.
“गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण चर्चेला आलं. हा वाद जमिनीच्या वादातून झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांची घटना देखील गंभीर आहे. या घटनांना इतर देखील अँगल आहेत. घोसाळकर यांची हत्या दुर्दैवी आहे. ही हत्या वैयक्ती वादातून झाली आहे. फेसबुक लाईक करताना ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीचा अंगरक्षक अमरिंदर कुमार याला अटक केली आहे. त्याची पिस्तुल लायसन्स असणारी होती”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली.
पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्ल्यावर फडणवीसांची भूमिका
“देशाचे पंतप्रधानांबाबत चुकीचं बोलणं योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आलेला नाही. निखिल वागळे यांना पोलिसांनी आधीच सांगितल होतं की आम्ही पुण्यातील रस्ता क्लिअर करतो मग तुम्ही जा. मात्र निखिल वागळे यांनी ऐकलं नाही. त्यांना वाचवण्यासाठी साध्या ड्रेसमधील लोक देखील होते”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
‘मला सगळ्यांपासून धोका वाटू लागलाय’
“जळगाव जिल्ह्यात कोणापासून कोणाला धोका आहे, हे मला माहिती नाही. पण मला सगळ्यांपासून धोका वाटू लागला आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.
‘महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक आली’
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत इतर मुद्द्यांबाबतही सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने पहिला नंबर पटकवला आहे. शेतकऱ्याला 12 तास वीज उपलब्ध होईल अशी व्यवस्था आपण करत आहोत. यासाठी एक मॉडेल तयार केलं आहे. आपण आता शेतकऱ्याला वीज देताना ती 7 रुपये प्रति युनिट खर्च येतो. या मॉडेलमुळे खर्च कमी होईल. मोदी यांनी प्रधानमंत्री सोलार योजना आणली आहे. त्यामुळे 300 युनिट प्रमाणे वीज मोफत मिळणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र नार्कोटिक्स सेल उभं केलं जाईल’
“ड्रग्जबाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. जर एखादा पोलीस गुंतला असेल तर त्यालाही तात्काळ बडतर्फ केले जाईल. केमिकल कारखान्यातील मशिनचा वापर करून एमडी बनवलं जातंय. यासाठी बंद आणि सुरू असलेल्या केमिकल कारखानांची चौकशीची मोहिम राबवली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र नार्कोटिक्स सेल उभं केलं जाईल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.