Devendra Fadnavis: आता तरी सुधरा, नाही तर सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांची आघाडीला इशारा
Devendra Fadnavis: भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्दयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आघाडी सरकारला ललकारले आहे. ओबीसी आरक्षणासाठी कोणतंही बलिदान द्यावं लागलं तर ते देण्यासाठी आम्ही उभं राहू. पण काही झालं तरी ओबीसींचं आरक्षण हे परत मिळवल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. महाविकास आघाडीला चेतावणी देतोय आता तरी सुधरा नाही तर तुम्हाला ओबीसी (obc) समाज सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. येता काळ संघर्षाचा आहे. आज जर लढलो नाही तर आपले अधिकार कधीच मिळणार नाहीत. आज उभं राहिलो नाही तर कधीच उभं राहता येणार नाही. आज संघर्ष केला नाही तर संघर्षासारखं राहणार नाही. इतिहास एकदाच संधी देतो. ती संधी दिलीय संघर्ष करण्याची. संधीचं जो सोनं करतो तोच इतिहासात राहतो. जेव्हा सत्ता आपल्या मानगुटीवर बसते, त्या सत्तेशी जो समझोता करतो तो कधीच इतिहास नोंदवू शकत नाही. सत्तेशी समझोता नाही तर संघर्ष करावा लागतो. ही संघर्षाची वेळ आज आली आहे. या जुल्मी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी एक एक ओबीसी पेटून उठला पाहिजे. भाजप ताकदीने तुमच्या पाठी उभी राहिल, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. काही वाटेल ते झालं आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नसो. आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भाजपचा डीएनए ओबीसी
भाजपचा डीएनए ओबीसी आहे. भाजपचा पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसींच्या भरवश्यावर मोठा झालेला हा पक्ष आहे. बारा बलुतेदार हे भाजपचे मतदार आहेत. भाजपला मानणारे आहेत. मोदी मजबूत पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांना जात नसते. पण जेव्हा विरोधक जात काढतात ते मोदीही ओबीसी समाजाचेच आहेत हे सांगावं लागतं. मोदींनी जगात भारताला नंबर वन केलं. देशातील कॅबिनेटमध्ये देशातील सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. आम्ही अलंकारीक पद्धतीने ओबीसींना स्थान देत नाही. कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो, तसा ओबीसींचा वापर करत नाही. पुष्परचनेसारखं काँग्रेस ओबीसी नेते तयार करतात. तसं आम्ही करत नाही. नेते मोठे होतात. पण समाज पुढे जात नाही. एखादा ओबीसी नेता तयार करतात त्याच्या भरवश्यावर दुकानदारी करतात, असा हल्लाबोलही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ओबीसी जनताच सर्वोच्च
या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा उघडा पाडला आहे. ओबीसी नेते म्हणजे समाज नाही. ओबीसी समाजामुळेच नेते आहेत. एखादा नेता आला, गेला काही फरक पडत नाही. फडणवीस असला नसला तरी काही फरक पडत नाही. पण ओबीसी जनता सर्वोच्च आहे, असंही त्यांनी सांगितलं.