2 टक्के गरीबांची खंत, 40 टक्के लसीकरण झालेल्या देशांना ऐकू येईल काय?, मदतीचा हात द्यायला हवा : सामना
जगातील जे गरीब देश लसीकरणाच्या लढाईत दुर्दैवाने मागे पडले आहेत, त्यांना मदतीचा हातही द्यावा. जगातील 'दोन टक्क्यां'ची ही खंत आहे. 40 टक्के लसीकरण झालेल्या देशांना ती ऐकू येईल काय?, हा खरा प्रश्न असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
मुंबई : ‘कोरोना संपणार नाही’ असे जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारीच स्पष्ट केले आहे. असे असेल तर कोरोना लसीकरण प्रत्येक देशासाठी किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. 40 टक्के लसीकरण झालेल्या विकसित आणि श्रीमंत देशांनी त्यांचे लसीकरणाचे उद्दिष्ट जरूर लवकर पूर्ण करावे. मात्र त्याच वेळी जगातील जे गरीब देश या लढाईत दुर्दैवाने मागे पडले आहेत, त्यांना मदतीचा हातही द्यावा. जगातील ‘दोन टक्क्यां’ची ही खंत आहे. 40 टक्के लसीकरण झालेल्या देशांना ती ऐकू येईल काय?, हा खरा प्रश्न असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
लसीकरणाच्या बाबतीत गरीब देश मागे
संपूर्ण जग मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी झुंज देत आहे. त्याविरोधात सर्व पातळ्यांवर उपाय योजले जात आहेत. कोरोना लसीकरणानेही सर्व देशांमध्ये आता वेग पकडला आहे. जगाचा विचार केला तर जगाचे 40 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे. तथापि, या समाधानाला एक काळजीची झालरदेखील आहे. जगाचे 40 टक्के लसीकरण झाले असले तरी हे सर्व विकसित आणि विकसनशील देश आहेत. गरीब देश या बाबतीत मागेच आहेत.
लसीकरणासाठी गरीब देशांना मदत करा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनीच ही खंत व्यक्त केली आहे. एका ट्विटद्वारे त्यांनी हे ‘वास्तव’ जगासमोर मांडले आहे. ट्विटमध्ये त्या म्हणतात की, ‘या आठवड्यात जगभरातील कोरोना लसीकरणाने 40 टक्क्यांचा टप्पा ओलांडला असला तरी आर्थिक दुर्बल आणि गरीब देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण फक्त 2 टक्केच आहे’. कोरोना लसीकरणाबाबत गरीब देशांना श्रीमंत देश आणि लस उत्पादक अशा सगळय़ांनी मदत करावी, असेही आवाहन गोपीनाथ यांनी केले आहे आणि ते योग्यच आहे.
गरीब देश कोरोनाने चिरडलेत, मदत करायलाच हवी
गरीब देश आधीच कोरोना महामारीखाली चिरडले गेले आहेत. श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्था जेथे या महामारीने खिळखिळय़ा झाल्या आहेत तेथे गरीब देशांची काय कथा? कोरोना महामारीने त्यांची अवस्था पार विकलांग करून टाकली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यात कोरोना लसीकरणाचा आर्थिक बोजा सहन करणे गरीब देशांसाठी कठीण आहे, ही गीता गोपीनाथ यांची खंत चुकीची नाही. त्यामुळे अशा देशांसाठी जगाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
प्रत्येक देश आपापले ठिगळ बुजविण्याचे प्रयत्न करतायत
कोरोना जरी गरीब-श्रीमंत, सबल-दुर्बल, जात-पात, धर्म, पंथ असा भेदभाव करीत नसला तरी त्यावर प्रभावी उपाय ठरलेल्या लसीकरणात मात्र दुर्दैवाने हा भेद दिसून येत आहे. त्याला पर्याय तरी काय आहे? कोरोना महामारीने संपूर्ण जगाचेच आभाळ फाटले आहे. प्रत्येक देश आपापले ठिगळ बुजविण्याचा कसाबसा प्रयत्न करीत आहे. त्यात पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट असे कोरोनाचे तडाखे सुरूच आहेत. त्यामुळे थोडेफार सुरळीत होणारे अर्थचक्र पुनःपुन्हा बिघडत आहे. सर्वच देशांची ही कसरत सुरू आहे आणि ती करतच लसीकरणाचा पुढचा टप्पा गाठला जात आहे.
ही प्रत्येकाची जबाबदारी
विकसित आणि विकसनशील देश आर्थिक अडचणी कमी असल्याने कोरोना, लॉकडाऊन वगैरे तडाखे सोसूनही लसीकरणाचे काम वेगाने करु शकत आहेत. प्रश्न आहे तो दुर्बल आणि गरीब देशांचा. गरीब असणे हा काही त्यांचा गुन्हा नाही. ते त्यांचे दुर्दैव असू शकते, पण म्हणून त्यांना दैवाच्या अधीन सोडणेही योग्य नाही. संपूर्ण जग हे जर आपण ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणत असू तर त्या जगातील प्रत्येक देश कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी कसा समर्थ आणि सक्षम होईल हे पाहणे प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. श्रीमंत आणि विकसित देशांची जबाबदारी यात अर्थातच मोठी आहे.
(devlopement Country Should Be help For poor Country Over vaccination)
हे ही वाचा :
सरकारचा अध्यादेश आगामी पोटनिवडणुकीला लागू होणार नाही? पंकजा मुंडेंनंतर नरकेंचही मोठं वक्तव्य