शिवसेनेच्या जाहिरातीनंतर शिवसेना-भाजप युतीत नाराजीनाट्य?, मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितले
Narendra Modi and Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांवर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे जाहिराती दिसत होत्या. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
काय म्हणाले होते दरेकर
शिवसेनेने ज्या जाहिराती केल्या आहेत, त्या योग्य नाहीत. या जाहिरातींमध्ये एकनाथ शिंदे यांना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दाखवले आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा दिली आहे. त्यामुळे एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कुणी खतपाणी घालत असेल तर त्याला बळी पडू नये. त्यामुळे वातावरण प्रदुषित होईल, हे मात्र नक्कीच असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दीपक केसरकर यांनी दिले स्पष्टीकरण
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सर्वेक्षणावरून शिवसेना भाजपा युतीत वाद नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. जाहिरातीत चूक होऊ शकते. एखाद्या जाहिरातीमुळे कदाचीत गैरसमज पसरले असतील तर आम्ही एकत्र बसून ते दूर करू. ज्यांना आमच्यामध्ये भांडणं लावायचे आहेत, त्यांना लावू द्या. शिंदे आणि फडणवीस हातात हात घालून काम करत आहेत. आताही आम्ही दोन-अडीच तास एकत्र होतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांला लगावला.
ती बातमी चुकीची
शिंदे गटातील पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे. त्यासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून दबाब आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यावर दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, पाच मंत्र्याना डच्चू मिळणार ही बातमी चुकीचे आहे. कोणताही दबाब आलेला नाही. युतीचे काम चांगले आहे.
काय आहे जाहिरात
राष्ट्रामध्ये मोदी
महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.