मुंबईतील दोन जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, मविआचं जागावाटप कुठपर्यंत आलं?
महाविकास आघाडीत मुंबईतील दोन जागांसाठी मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील दोन जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गट इतके आग्रही आहेत की दोन्ही पक्षांकडून संबंधित जागांसाठी उमेदवारही निश्चित करण्यात आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमधून जवळपास 80 टक्के जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील जागांकडे नागरिकांचं विशेष लक्ष आहे. कारण मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती जागांवर लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासह पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील हिरावलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची आहे. पण ठाकरे गट नेमक्या किती जागांवर लढणार? याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मुंबईतील दोन जागांसाठी मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील भायखळा आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भायखळा आणि वर्सोवाच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांसाठी आपापल्या पक्षाचे उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीत भायखळा आणि वर्सोवा या जागा चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत.
ठाकरे गट मुंबईत किती जागांवर लढणार?
महाविकास आघाडीत मुंबईतील एकूण जागांपैकी 2 तृतीयांश जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार आहे. तसेच काही जागांची आदलाबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार आहे. काँग्रेस 13 ते 14 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट दोन ते तीन जागा लढणार आहे. तसेच समाजवादी पक्ष एक जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात मुंबईत ठाकरे गट हा मविआतला मोठा भाऊ असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या जवळपास 30 ते 31 जागांसाठी जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर 5 ते 6 जागांवर निर्णय होणं अजून बाकी आहे. पुढच्या बैठकीत उर्वरित जागांबाबतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.