मुंबई | 25 जुलै 2023 : निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन आज विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. निधी वाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निवेदन देत असताना काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी निधी वाटपावरुन आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मला सावत्र भाऊच्या चष्म्यातून बघू नका, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, असं अजित पवार म्हणाले. तर 15 दिवसात भाऊ सावत्र भावासारखा वागू लागला, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण तिथे बसलेले असताना मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आम्ही मंजुरी दिली. आम्ही भेदभाव केला नाही. काँग्रेसचं कृषी महाविद्यालय हे दुसऱ्याचं आहे, असं नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार विरोधकांच्या आरोपांना देत होते. त्यावर यशोमती ठाकूर यांनी अजित पवार यांना भर सभागृहात निधी वाटपाबाबत प्रश्न विचारले.
यशोमती ठाकूर : मतदारसंघात तुम्ही लोकांना पैसे… दादा…
अजित पवार : थांबा…
विधानसभा अध्यक्ष : थांबा… थांबा. आता बोलू नका मध्ये… मध्ये बोलू नका ताई… खाली बसा ताई…खाली बसा.. खाली बसा…
अजित पवार : भावाच्या नात्याने ओवाळणी देतो. काळजी करु नका.
यशोमती ठाकूर : 15 दिवसांत सावत्र भावासारखे वागतायंत
अजित पवार : नाही… नाही… तुम्ही चष्मा बदला… सावत्र भावाच्या हिशोबाने तुम्ही पाहू नका. मी सावत्र बहिणीच्या हिशोबाने बघत नाहीय
यशोमती ठाकूर : बघताय ना… बघताय ना…
अजित पवार : नाही… नाही….
विधानसभा अध्यक्ष : चला पुढे जाऊ… पुढे जाऊ…
अजित पवार : अध्यक्ष महोदय, या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांची काही मते असू शकतात. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण कोणताही दुजाभाव केला जाणार नाही.
यशोमती ठाकूर : स्टे उचला दादा…
अजित पवार : कुठे स्टे आहे ते दाखवा, मी उचलतो…
विधानसभेतील गोंधळानंतर यशोमती ठाकूर या सभागृहाच्या बाहेर आल्या. त्यांनी विधान भवनात ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र नातं असतं. आम्ही जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून अजित दादांना आम्ही दादा म्हणूनच बघतोय. भाऊ म्हणूनच बघतोय. 15 दिवसांत भाऊ दुसऱ्या बाकांवर जाऊन बसला आणि सावत्र भावासारखा वागला तर ते वेदनादाकच आहे ना”, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.
दरम्यान, “अजित दादा फार निर्मळ मनाचे आहेत. त्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे. आमच्या सर्व आमदारांना 25-25 कोटींचा निधी देवून टाका”, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.