ठाकरे गटाला घेरण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार? पडद्यामागे जोरदार हालचाली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईतही आढावा बैठका सुरु झाल्या आहेत आणि दक्षिण मुंबईत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात, भाजपकडून बड्या नेत्याला मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणुकीसाठी 6 महिन्यांचा वेळ आहे. मात्र, आतापासून ठाकरे गट आणि भाजपचे नेते आमनेसामने आले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा पराभव अटळ असल्याचा दावा केलाय. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांविरोधात भाजप पक्ष विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकरांना मैदानात उतरवू शकतो. उद्धव ठाकरेंनीही नुकताच दक्षिण मुंबई लोकसभेचा आढावा घेतला, ज्यात उद्धव ठाकरे म्हणालेत की, 2019 मध्ये दक्षिण मुंबईत आपण जिंकलो. 2024 मध्येही ही जागा आपल्याकडेच राहील. खासदार अरविंद सावंतच उमेदवार असतील, त्यामुळे कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच जोमाने मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे गटावर टीका केलीय. आमच्याच मेहेरबानीवर अरविंद सावंत जिंकले, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. 2024 मध्ये भाजपचाच खासदार होणार, असा दावा आशिष शेलार यांनी केलाय.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची स्थिती नेमकी कशी?
आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची स्थितीही जरा समजून घेऊया. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेच्या जागा येतात. वरळी विधानसभा, शिवडी विधानसभा, भायखळा विधानसभा, मलबार हिल विधानसभा, कुलाबा विधानसभा, मुंबादेवी विधानसभा यापैकी वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत. शिवडीतूनही ठाकरे गटाचेच अजय चौधरी आमदार आहेत.
भायखळ्यातून शिंदे गटाच्या यामिनी जाधव आमदार आहेत. मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर आमदार आहेत. मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल आमदार आहेत. म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडे 3-3 मतदारसंघ आहेत.
याचाच अर्थ दक्षिण मुंबईची लढाई काट्याची असेल. 2019मध्ये भाजप-शिवसेनेची युती असताना शिवसेनेकडून अरविंद सावंत उमेदवार होते. त्यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. अरविंद सावंतांना 4 लाख 21 हजार 937 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 3 लाख 21 हजार 870 मतं मिळाली. जवळपास 1 लाख 67 मतांनी अरविंद सावंतांचा विजय झाला.
दक्षिण मुंबईतील मतांचा विचार केला तर, मराठी, गुजराती, जैन, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आहेत. पण मराठी मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे. राहुल नार्वेकर अभ्यासूही आहेत आणि आक्रमकही. नुकतीच तशी झलक कुलाबा, कोळीवाड्यात दिसली होती.