विषय पैशांचा, ‘त्या’ यादीचा, आकडा 350 कोटी, सभागृहात परब-सामंत आमनेसामने
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सभागृहात जोरदार खडाजंगी रंगल्याची बघायला मिळाली. अनिल परब यांनी यावेळी चांगलाच आक्रोश करत कायदेशीर कारवाईची मागणी केली.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झालेली बघायला मिळाली. अनिल परब यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. खराब कामासाठी मुंबई महापालिकेने ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला पुन्हा 350 कोटी रुपयांच कंत्राट महानगरपालिकेने दिलंच कसं? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. मंत्री उदय सामंत यांच्याकडून संबंधित कंपनीने खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं मान्य करण्यात आलं. या दम्यान याच मुद्द्यांवरुन दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहात शाब्दिक चकमक बघायला मिळाली.
कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल केला जाईल, तशी कारवाई केली जाईल, असं उदय सामंत म्हणाले. पण त्यांच्या याच वाक्यावरुन अनिल परब संतापले. संबंधित कंपनीने खोटे कागदपत्रे सादर केले हे तुम्ही मान्य केलं ना, मग गुन्हा दाखल कधी करणार? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
अनिल परब यांचे आरोप काय?
मे मैनदिप एंटरप्रायजेस कंपनीवर खराब काम करणे, काळ्या यादीत असताना देखील खोटी कागदपत्रे सादर करून संबंधित कंपनीने पुन्हा कंत्राट मिळवलं. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आमच्यामागे ईडी चौकशी लावता, मग खोटी कागदपत्रे सादर करुन कंत्राट घेतलेल्या कंपनीला तूम्ही का वाचवत आहात? असा सवाल अनिल परब यांनी सभागृहात केला. तसचे संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करून मालकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
“महापालिकेने संबंधित कंपनीचे कागदपत्रांची चौकशी केली. म्हणून त्या कंपनीचे कागदपत्रे खोटे आहेत हे समोर आलं. ते स्वत: कागदपत्रे बनावट असल्याचं मान्य करत आहेत. तरीही ते त्या कंपनीला वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेत? संबंधित लोकं सरकारचे जावाई आहेत का? तुम्ही निर्णय का घेत नाही?”, असे प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले.
मंत्री उदय सामंत यांची नेमकी भूमिका काय?
“बनावट कागदपत्रांचा अहवाल हा 7 मार्च 2023 ला आला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत कुठेही तडजोड करण्याची आवश्यकता नाही. ब्लॅकलिस्टमध्ये तात्काळ टाकू हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. पण गुन्हा दाखल करत असताना कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे. कायदेशीर बाबी तपासून घेऊनच गुन्हा दाखल कर”, असं उदय सामंत आपल्या उत्तरात म्हणाले.