विजय शिवतारे बॅकफूटवर? रात्रीच्या बैठकीत काय घडलं?; तीन बडे नेते आणि…
राजकारणात काहीही घडू शकतं. काही काळापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे कट्टर शत्रू होतात, तर एकमेकांचे तोंड न पाहणारेही गळ्यात गळे घालून फिरू लागतात. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही अशीच काही परिस्थिती उद्भवली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.
राजकारणात काहीही घडू शकतं. काही काळापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे कट्टर शत्रू होतात, तर एकमेकांचे तोंड न पाहणारेही गळ्यात गळे घालून फिरू लागतात. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही अशीच काही परिस्थिती उद्भवली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला असून त्यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती समोर येत आहे. काल (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली.
तेथेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजय शिवतारेंचं बंड शमल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघातील वाद शमल्याची चिन्ह आहेत.
बुधवारी वर्षा बंगवल्यावर महायुतीतील या तीनही प्रमुख नेत्यांची शिवतारेंसोबत बैठक झाली. बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.
#WATCH | Shiv Sena leader Vijay Shivtare met Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CMs Devendra Fadnavis & Ajit Pawar, in Mumbai. pic.twitter.com/NeQUtU0e7p
— ANI (@ANI) March 28, 2024
काय होता वाद ?
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या. तर महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र महायुतीतील आणखी एक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हेदेखील बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते
राज्यात चिखल झाला आहे. राज्यातील जनतेला नवीन पर्याय हवे आहेत. पवार पर्व संपण्यासाठी मी लढत आहे. जनतेला दुसरा पर्याय हवा असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली होती. त्यामुळे बारामतीच्या जागेचा पेच वाढला होता.
मात्र काल (बुधवारी) ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत शिवतारेंची पुन्हा बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणल्याच्या चर्चा आहेत. फडणवीसांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चाही सुरू आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन शिवतारे हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील. ते काय बोलतात, काय निर्णय जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.