मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या धक्कादायक आणि खळबळजनक विधानाने भाजपच्या गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. मला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतचा भाजप आवडत नाही, असं विधानच सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानाने नुसती खळबळ उडाली नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपने चूक केलीय का? असा अर्थही मुनगंटीवार यांच्या विधानातून काढला जात आहे. सुधीर भाऊंच्या या विधानामागे काही राजकीय संकेत आहेत का? अशी चर्चाही दबक्या आवाजात केली जात आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावणारं विधान केलं. मला शिंदे सोबतचा भाजप आवडत नाही. मला अजितदादांसोबतचा भाजपही आवडत नाही. मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो. कोणाच्या सोबत असल्याने अडचणी येत नाही, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. देशाची सेवा करणारा भाजप आवडतो असं जरी मुनगंटीवार यांनी म्हटलं असलं तरी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत राहून भाजप देश सेवा करू शकत नाही का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
मला पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही पक्ष फोडता. अरे रावणाच्या अत्याचाराविरोधात त्याचे सख्खे भाऊ रामासोबत आले. त्यामुळे रामाला तुम्ही पक्ष फोडला म्हणून आरोपी कराल का? एखादा व्यक्ती, एखाद्या पक्षाचा नेता नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी व्यक्ती आधारीत राजकारण करत नाही. आम्ही सेवाआधारीत राजकारण करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानावरूनही त्यांनी पत्रकारांना रोखलं. मोदींसाठी आम्ही भाजपसोबत येतोय, असं अजित पवार यांनीही सांगितलं. या देशाचं नेतृत्व राहुल गांधी करू शकत नाही. त्यासाठी मला ते योग्य वाटत नाही, असं अजितदादा यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही त्यांचं विधान ट्विस्ट करू नका. तुम्ही हा प्रयत्न करत असाल तर मीही पत्रकारितेची डिग्री घेतलेली आहे. मलाही पत्रकारिता कळते, असं ते म्हणाले.
कोणताही पक्ष त्याच्या विचारावर आधारीत आवडला पाहिजे. व्यक्तीमुळे आवडू नये. मोदींना जेव्हा पाठिंबा दिला जातो तेव्हा तो व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा असतो. ध्येयधोरणाला पाठिंबा असतो. अशावेळी ध्येयधोरणाला कधीच तिलांजली दिलेली नसते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी काँग्रेसला खुल्लं आव्हान दिलं. काँग्रेसने कधी तरी आम्ही अमूक काम केलंय असं सांगितलं का? एवढी वर्ष काँग्रेस सत्तेत होती, त्यांनी सांगावं कोणतं काम केलं? मोदींपेक्षा आम्ही चांगलं काम केलं असं काँग्रेसने म्हटलं का? काँग्रेसने केवळ मोदींवरच टीका केली, त्यापलिकडे काय केलं? असा सवालही त्यांनी केला.