Lalit Patil : पोलिसांना गुंगारा देत दोन राज्यात लपला; ललित पाटील याचा मोठा डाव काय होता?
आम्हाला मानसिक त्रास दिला जात आहे. ललितच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे. पोलीस आणि राजकीय नेते त्याला पैसे मागत आहे. त्याचा एन्काऊंटर करण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप ललित पाटील याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : तब्बल 15 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याला साकीनाका पोलिसांनी कर्नाटकाच्या बंगळुरूमधून अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टासमोर उभं केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. या 15 दिवसात ललित पाटील दोन राज्यात लपून बसला होता. पाच शहरात तो गेला होता. पोलीस त्याचं लोकेशन ट्रेसही करत होते. पण प्रत्येकवेळी तो गुंगारा देऊन पळून जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याचा वेगळाच डाव होता. पण तो पकडला गेल्याने त्याचा डाव उधळला गेला आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर तो 15 दिवस फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत होता. तो पकडला जात नव्हता. त्याचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. पोलीस जायचे आणि तो पळून गेलेला असायचा. तो फरार झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून इनपूट घेऊन त्याचा माग काढला जात होता. ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यावर तो सर्वात आधी चाळीसगावला गेला. नंतर धुळे, संभाजीनगर आणि मग गुजरातला गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
15 पथके मागावर
ललित पाटील हा गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस लपून राहिला होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. तर पुणे पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. अशी एकूण 15 पथके त्याच्या मागावर होती. त्यानंतर गुजरातमधून तो थेट समृद्धी मार्गाने सोलापुरात आला होता. सोलापुरातून तो कर्नाटकाला गेला. कर्नाटकातील बंगळुरू येथे असतानाच त्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली.
डाव काय होता?
ललित पाटील हा बंगळुरूमधून थेट परदेशात पळून जाणार होता. त्याने तशी तयारी केली होती. पण पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला. वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे तो सापडला. नाही तर तो परदेशात पळून गेला असता तर त्याला पकडणं कठिण झालं असतं.
वडिलांची प्रकृती बिघली
दरम्यान, ललित पाटील याला अटक केल्याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ललित पाटील याच्या वडिलांना यापूर्वी हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.