मुंबई : गेल्या २८ वर्षांपासून गुन्हा करुन आरोपी फरार होता. त्याच्या शोधासाठी अनेक अधिकारी आले अन् गेले. परंतु तो सापडत नव्हता. पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी आले म्हणजे त्याच्या समोर त्या फरार आरोपीची फाईल असायची. परंतु तो काही हाती लागत नव्हता. यावरुन तुम्हाला कल्पना आली असेल की तो आरोपी किती धूर्त व चतुर होतो. अखेरी असा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला. परंतु तो काही पोलिसांच्यामुळे नव्हे तर ‘BEST’ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो पोलिसांना सापडला. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे अन् चौकशी सुरु आहे.
काय आहे प्रकरण
मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. 1995 मध्ये वीरेंद्र संघवी उर्फ महेश शाह यांच्यावर बनावट शेअर्स विकल्याचा आरोप होता. पोलिसांनी वीरेंद्रविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.परंतु वीरेंद्र फरार होता.पोलीस त्याचाही शोध घेत होते. अखेर 28 वर्षांनंतर पोलिसांना यश आले आणि वीरेंद्रला अटक करण्यात आली.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी मदत केली
पोलिसांनी वीरेंद्रला अटक करण्यासाठी ‘BEST’ कर्मचाऱ्यांची मदत घेतली. प्रत्यक्षात वीरेंद्र दाना बंदर परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी वीज बिल पडताळणीच्या बहाण्याने वीरेंद्रला ‘BEST’ च्या कार्यालयात भेटायला बोलावले. त्याठिकाणी तो पोहचताच त्याला अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.