अटी शर्तींमुळे नुकसान निश्चिती कठीण, डॉ. अजित नवले यांचा आरोप
नुकसान निश्चितीसाठी गाव हे एकक न ठेवता परिमंडळ एकक ठेवण्यात आले. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात पाऊस झाला नाही तर
मुंबई : सलग पाच दिवस किमान दहा मिलिमीटर पाऊस झाला. त्या परिमंडळामध्ये अतिवृष्टी झाली, असे गृहीत धरून भरपाई देण्यात येईल. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे. असा आरोप डॉ. अजित नवले यांनी केलाय. राज्य सरकारने हा निर्णय घेताना, केवळ पाच दिवस, सलग दहा मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर त्या परिमंडळात लगेच भरपाई दिली जाईल, असा सरळ निर्णय घेतला नाही. याच्या जोडीला आणखीही अतिशय जाचक अटी जोडल्या आहेत.
अतिवृष्टी नुकसान निश्चिती आणखी जटिल
घोषणा करायची. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. याची काळजीही घ्यायची, हा फडणवीस सरकारचा नेहमीचा कित्ता यावेळीही गिरवण्यात आला आहे. सलग पाच दिवस प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस पडेल. त्यानंतर त्याच्या जोडीला मागील दहा वर्षात त्या परिमंडळामध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असावा लागेल.
प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची
शिवाय त्यानंतर पुढील पंधरा दिवस सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (एन.डी.व्ही.आय) तपासून तो जर वनस्पती स्थिती नुकसानग्रस्त दर्शवित असेल तरच असे परिमंडळ पंचनाम्यासाठी पात्र ठरणार आहे. पंचनाम्यात 33 टक्के नुकसान दिसले तरच भरपाई मिळणार आहे. नव्या निर्णयामुळे प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनविण्यात आली आहे, असा आरोप अजित नवले यांनी केलाय.
रिडींग किती विश्वासार्ह मानायचे
नुकसान निश्चितीसाठी गाव हे एकक न ठेवता परिमंडळ एकक ठेवण्यात आले. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात पाऊस झाला नाही. त्याच परिमंडळातील इतर गावात अतिवृष्टी झाली तरीही इतर गावे मदतीपासून वंचित राहणार आहेत. शिवाय आपल्याकडील पर्जन्यमापक यंत्रांची स्थिती पाहता यानुसार येणारे रिडींग किती विश्वासार्ह मानायचे हाही प्रश्नच आहे.
नव्या पद्धतीमुळे जटिलता वाढविण्यात आली आहे. शेतकरी मदतीपासून आणखी दूर लोटले गेले आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केलाय.