कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर मशीद की मंदिर, कोर्टाने नेमका काय दिला निर्णय?
durgadi killa: जागा ही शासनाच्या मालकीची आहे. मंदिर व मशीद बाबत कुठलाही निर्णय न्यायालयाने दिला नाही. मात्र संघटनेने ही जागा मशीद आहे, असा दावा केला होता. न्यायालयाने हा दावा निकाली आणल्याने तो देखील संपुष्टात आणलेला आहे.
Durgadi Killa: कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण न्यायालयाचा निकाल 48 वर्षांनी आला आहे. या किल्ल्यावर मशीद की मंदिर आहे, असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही. परंतु ती जागा शासनाची असल्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाचा आदेश येताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेने दुर्गाडी किल्ल्यावर जात आरती केली. यानंतर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
यामुळे फेटाळला दावा
दुर्गाडी किल्ल्याबाबत न्यायालयाचा आज निकाल लागला आहे. याबाबत सरकारी वकील सचिन देशपांडे यांनी सांगितले की, न्यायालयात जो दावा दाखल होता, तो मुदतबाह्य आहे. म्हणून न्यायालयाने फेटाळलेला आहे. शासन या जागेचा मालक आहे. 1966 साली या जागेचा ताबा शासनाने घेतला होता. त्यानंतर 1976 साली दावा काही संघटनेकडून या जागेवर दावा दाखल करण्यात आला होता. मात्र दावा हा मुदतीत दाखल न केल्याने हा दावा फेटाळलेला आहे. यामुळे शासनाची मालकी या जागेवरती आहे हे सिद्ध झाले.
मुस्लीम धर्माचा दावा
1976 साली मजलिश मुशाहील या संघटनेकडून दुर्गाडी किल्ल्याची जागा मुस्लीम धर्माच्या ईदगा ,मज्जित यांच्या मालकीची असल्याचा दावा करत त्यांची मालकी घोषित करावी, असा दावा न्यायालयात केला होता. मात्र हिंदू संघटनेचे वकील आणि शासनामार्फत सचिन देशपांडे आणि इतर वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशात आले की हा दावा मुदतीत नाही. त्यामुळे हा दावा मुदतीत नाही. म्हणून निकाली काढला. मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता दुरुस्ती करण्याची आता शासनाला पूर्णपणे अधिकार आहे.
शासनाची मालकी सिद्ध
जागा ही शासनाच्या मालकीची आहे. मंदिर व मशीद बाबत कुठलाही निर्णय न्यायालयाने दिला नाही. मात्र संघटनेने ही जागा मशीद आहे, असा दावा केला होता. न्यायालयाने हा दावा निकाली आणल्याने तो देखील संपुष्टात आणलेला आहे. दरम्यान, हिंदू संघटनांनी हा निर्णय आपल्या बाजूने लागल्याचा दावा केला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला शासनाचा असल्याची आमची भूमिका होती, असे हिंदू संघटनेतर्फे सांगण्यात आले.