नवरात्रीत मेट्रो 2 अ आणि 7 रात्री उशीरापर्यंत धावणार, पाहा किती फेऱ्यांची वाढ
नवरात्र उत्सवात मुंबईकरांना रात्री उशीरापर्यंत सणाचा आनंद लुटता येणार आहे. मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गांवर रात्री उशीरापर्यंत मेट्रोच्या फेऱ्या चालविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : नवरात्र उत्सवाला प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 या मेट्रो मार्गांवर रात्री उशीरापर्यंत मेट्रोची सेवा सुरु राहणार आहे. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी मुंबईकर रात्री उशीरापर्यंत घराबाहेर असतात त्यांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सवात 19 ते 23 ऑक्टोबर या काळात मेट्रो मार्ग 2 अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग 7 च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही रात्री 12 :20 वाजता सोडण्यात येणार आहे.
19 ते 23 ऑक्टोबर या काळात सुमारे 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रोच्या एकूण 14 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. सध्या मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी 5:55 ते रात्री 10:30 या वेळेत सुमारे 253 फेऱ्या चालविण्यात येतात. या फेऱ्या दर साडे सात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू असतात. तसेच शनिवारी 238 फेऱ्या आणि रविवार 205 फेऱ्या या 8 ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आत्तापर्यंत पर्यावरणपूरक अशा मेट्रोने सुमारे 5 कोटी नागरिकांनी प्रवास करून मेट्रोला नागरीकांनी पसंती दर्शविली आहे.
14 अतिरिक्त फेऱ्यांची भेट
नवरात्र उत्सवाच्या काळात दि.19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 दरम्यान रोजच्या नियमित फेऱ्यानंतर दर 15 मिनिटांच्या अंतराने 14 अतिरिक्त फेऱ्या सुरू चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त फेऱ्यांच्या कालावधीत मेट्रो मार्ग 2 अ वरील अंधेरी ( पश्चिम ) आणि मेट्रो मार्ग 7 वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री 01:30 वाजता पोहचेल. अतिरिक्त फेऱ्यांमध्ये कामाच्या दिवशी (weekdays) ला 267 फेऱ्या तर सुट्टीच्या दिवशी (weekend’s) या फेऱ्या 252 इतक्या असणार आहेत.
प्रवासी संख्येत वाढ होणार
राज्याचे मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक मेट्रो सेवा उपलब्ध केली आहे. मुंबईकर नागरीक मेट्रोला पसंती देत असून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी 5 टक्क्यांनी वाढ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होईल आणि नागरीकांना नवरात्रीत सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येईल असे एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.