Sanjay Raut ED Action : मोठी बातमी ! संजय राऊतांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त, ED च्या कारवाईनं खळबळ
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
मुंबईः थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा ईडी विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला दिसणार आहे. त्याची चुणूक आता एकेक येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता दिसून येत आहे.
पत्राचाळ घोटाळा काय?
2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.
राऊत ते राऊत कनेक्शन
प्रवीण राऊतांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे 10 वर्षानंतर परत केले. हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे.
ED has provisionally attached immovable properties of Rs 11Cr under PMLA in Patrachawal redevelopment Project case.The attached assets are in form of lands held by Pravin Raut at Palghar,flat at Dadar of Smt Varsha Raut and plots at Alibaug held by Varsha Raut and Swapna Patkar.
— ED (@dir_ed) April 5, 2022
राऊतांना आरोप भोवले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी थेट ईडीवर आरोप केले होते. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्याने निवडणूक लढवली त्याने पन्नास जणांचा खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाही. तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला होता. हे आरोपही राऊतांना भोवले का, अशी चर्चा आता सुरूय.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
— ANI (@ANI) April 5, 2022
ईडीकडून कोट्यवधींची ट्रान्सफर
संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची ट्रान्सफर केल्याचा आरोप केला होता. 2017 मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सची चौकशी सुरू केली. जितेंद्र नवलानीच्या कंपनीला 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2020 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून नवलानीला 10 कोटी ट्रान्सफर केले. नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले. 15 कोटी रुपयांबाबत अशाच एका चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. सेक्यूरिटी ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश, चेक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला होता.
पुढे काय होणार?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात झडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, त्यात ईडीची कारवाई यामुळे कुरघोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. नुकतीच भाजप नेते प्रवीण दरेकरांची चौकशी झाली. आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेमधील कोण-कोणत्या नेत्यांच्या चौकशा होणार, त्या कोण करणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तूर्तास तरी राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यात शंका नाही.
इतर बातम्याः