मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना आज विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मिळालाय. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. पण जोपर्यंत मुंबई हायकोर्टाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत राऊतांनी पूर्ण लढाई जिंकलीय असं म्हणता येणार नाही. संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. पण ईडीने राऊतांच्या जामीनाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय.
संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या 102 दिवसांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर याआधी देखील सुनावणी झाली. पण त्यांना दिलासा मिळाला नव्हता. अखेर आज त्यांना विशेष पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला.
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. पण ईडीला संजय राऊतांची कोठडी वाढवून हवी होती. त्यामुळे ईडीच्या वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जास विरोध केला होता. कोर्टाने ईडीचा विरोध फेटाळत राऊतांचा जामीन अर्ज स्वीकारला. त्यामुळे संजय राऊतांनी कोर्टाची ही तात्पुरती लढाई जिंकलीय असं मानायला हरकत नाही.
पण लढाई अजून संपलेली नाही. कारण ईडीकडून मुंबई हायकोर्टात संजय राऊतांना जामीन मिळू नये सासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. या अर्जावर संध्याकाळी साडेचार वाजेपासून सुनावणी सुरु होतेय. त्यामुळे राऊतांना खरंच जामीन मिळतो का? ते मुंबई हायकोर्टाच्या निकालावर स्पष्ट होईल.
विशेष पीएमएलए कोर्टाच्या सुनावणीनंतर संजय राऊत पोलिसांच्या गाडीत बसून आर्थर रोड कारागृहाच्या दिशेला गेले. तर ईडीचे वकील अनिल सिंग आणि त्यांची टीम मुंबई हायकोर्टाच्या दिशेला गेली.
ईडीकडून हायकोर्टात राऊतांच्या जामीन अर्जाला आव्हान देणारा अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आला आहे. राऊतांना आणखी काही दिवस न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी ईडीच्या वकिलांची मागणी आहे. त्यामुळे ईडीचे वकील विशेष पीएमएलए कोर्टाच्या निकालाला चॅलेंज देणाार आहेत.
कोर्टात राऊतांचे देखील वकील आपली बाजू मांडतील. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई हायकोर्ट आपला अंतिम निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांना मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन मिळाला तर त्यांचे वकील संजय राऊत यांच्या जामीनाचं पत्र आणि रिलीज ऑर्डर आर्थर रोड कारागृहाबाहेरच्या पेटीत आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत टाकतील. त्यानंतर आज त्यांची रितसर जामीनावर जेलमधून सुटका होईल, असा अंदाज बांधला जातोय.